टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी टायटन नावाची एक पाणबुडी पर्यटकांना घेऊन गेली होती. मात्र, काही तासांतच ही पाणबुडी बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली होती. अखेर नौदलाला बेपत्ता टायटन पाणबुडीचे अवशेष सापडले असून पाणबुडीतील पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन कोस्ट गार्ड अधिकाऱ्यांना टायटॅनिक जहाजाजवळ टायटन पाणबुडीचे काही अवशेष सापडले. त्यानुसार पाणबुडीचा काही दिवसांपूर्वीच स्फोट झाला असून पाणबुडीच्या स्फोटात पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे.
अटलांटिक महासागरात टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली टायटन पाणबुडी रविवारी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तातडीने अमेरिका आणि कॅनडा दोन्ही देशांच्या नौदलाकडून शोधमोहीम राबविण्यात आली. त्यानंतर तब्बल चार दिवसांनी पाणबुडीच्या शोधात असलेल्या शोध आणि बचाव पथकांना गुरुवार, २२ जून रोजी सकाळी टायटॅनिकच्या अवशेषांच्या जवळ टायटन पाणबुडीचे काही अवशेष सापडले. टायटन पाणबुडीवरील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या ओशनगेट या कंपनीने दिली आहे. पाणबुडीच्या प्रेशर चेंबरमध्ये स्फोट झाला असून त्यामुळे प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, स्फोट नेमका कधी झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हे ही वाचा:
‘कॅस्ट्रोफिक इम्पोशन’मुळे पाणबुडीचा अपघात
टायटॅनिकच्या जवळ सापडले दोन अवशेष; ते टायटनचे आहेत का याचा शोध
लाचखोर आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड निलंबित
अपघातग्रस्त टायटन पाणबुडीमध्ये ओशनगेट एक्स्पिडिशन्सचे संस्थापक आणि CEO स्टॉकटन रश, फ्रेंच डायव्हर पॉल-हेन्री नार्गोलेट, ब्रिटिश अब्जाधीश हॅमिश हार्डिंग, पाकिस्तानी व्यापारी शहजादा दाऊद आणि त्यांचा १९ वर्षांचा मुलगा सुलेमान हे पाच जण होते. या दुर्दैवी अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.