राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून सन २०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार इत्यादी पुरस्कार सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत दरवर्षी देण्यात येतात. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असून राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे तसेच पुरस्कारांच्या क्षेत्रांमध्येही विस्तार करण्यात आल्याचे समाधान असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार २०२२ पुरस्कारासाठी पं. उल्हास कशाळकर यांचे नाव घोषित झाले असुन, २०२३ च्या पुरस्कारासाठी पं. शशिकांत (नाना) श्रीधर मुळ्ये यांची घोषणा करण्यात आली आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराच्या २०२२ साठी सुहासिनी देशपांडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे तर २०२३ साठी अशोक समेळ यांना पुरस्कार घोषित झाला आहे. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२२ चा पुरस्कार नयना आपटे यांना जाहीर झाला असून, २०२३ च्या पुरस्कारासाठी पं. मकरंद कुंडले यांची निवड झाली आहे.
हेही वाचा..
एअर इंडियाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार नवी कोरी विमाने
पंतप्रधान मोदींचे ‘शब्द’ असलेल्या भरड धान्याच्या गाण्याला ग्रॅमीचे नामांकन
सूरत रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू
भारत-अमेरिकेने उघडपणे केले इस्रायलचे समर्थन
नाटक विभागासाठी २०२२ चा पुरस्कार वंदना गुप्ते यांना तर २०२३ चा पुरस्कार ज्योती सुभाष यांना जाहीर झाला आहे. उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये २०२२ चा पुरस्कार मोरेश्वर निस्ताने यांना जाहीर झालेला असून, २०२३ चा पुरस्कार ऋषिकेश बोडस यांना जाहीर झाला आहे. कंठ संगीत प्रकारातील २०२२ चा पुरस्कार अपर्णा मयेकर यांना घोषित झाला असून, २०२३ चा पुरस्कार रघुनंदन पणशीकर यांना मिळाला आहे. लोककला क्षेत्रातील २०२२ चा पुरस्कार हिरालाल रामचंद्र सहारे यांना जाहीर झाला असून, २०२३ चा पुरस्कार कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज यांना जाहीर झाला आहे. शाहीरी क्षेत्रातील २०२२ चा पुरस्कार जयंत अभंगा रणदिवे यांना तर, २०२३ चा पुरस्कार राजू राऊत यांना घोषित झाला आहे. नृत्य वर्गवारीतील २०२२ चा पुरस्कार लता सुरेंद्र यांना जाहीर झाला असून, २०२३ साठी सदानंद राणे यांची निवड झाली आहे.
चित्रपट क्षेत्रासाठी २०२२ चा पुरस्कार चेतन दळवी यांना तर, २०२३ चा पुरस्कार निशिगंधा वाड यांना घोषित झाला आहे. कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील २०२२ चा पुरस्कार संत साहित्यिक व लेखिका प्राची गडकरी यांना जाहीर झाला असून, २०२३ चा पुरस्कार अमृत महाराज जोशी यांना घोषित झाला आहे. वाद्य संगीत क्षेत्रातील २०२२ चा पुरस्कार पं. अनंत केमकर यांना मिळाला असून, २०२३ साठी शशिकांत सुरेश भोसले यांची घोषणा झाली आहे. कलादान या प्रकारासाठी २०२२ साठी संगीता राजेंद्र टेकाडे यांचे नाव घोषित झाले आहे तर, २०२३ साठी यशवंत रघुनाथ तेंडोलकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तमाशा वर्गवारीतील राज्य सांस्कृतिक पुरस्कार बुढ्ढणभाई बेपारी (वेल्हेकर) यांना तर, २०२३ चा पुरस्कार उमा खुडे यांना घोषित झाला आहे. आदिवासी गिरीजन वर्गवारी मध्ये २०२२ साठी भिकल्या धाकल्या धिंडा तर, २०२३ साठी सुरेश नाना रणसिंग यांची निवड करण्यात आली आहे.