देशभरात कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा झपाट्याने वाढायला लागलेला असताना सरकारने कोरोनाच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ केला आहे. या टप्प्यात ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे.
भारताच्या लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी रोजी सुरूवात झाली होती. पहिल्या टप्प्यात आघाडीवरील कर्मचाऱ्यांचे आणि आरोग्यसेवा, अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण केल्यानंतर ४५-५९ वयोगटातील सहव्याधी असणाऱ्या आणि ६० वर्षांवरील सर्व वृद्ध व्यक्तींना लस देण्यात आली होती. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला १ मार्चपासून प्रारंभ झाला होता.
आजपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. यामध्ये ४५-५९ मधील सर्व नागरिकांना सरसकट लस देण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
पीपीएफ वरील व्याजदरात बदल नाही
ही लस सरकारी रुग्णालये, आरोग्य केंद्रांवर मोफत उपलब्ध आहे, तर खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी ₹२५० मोजावे लागत आहेत.
या टप्प्यासाठी नाव नोंदणी देखील सुलभ झाली आहे. कोविन या सरकारी संकेतस्थळावरून कोविड-१९ लसीसाठी नावनोंदणी करता येणार आहे. नावनोंदणी न करता ३ वाजल्यानंतर थेट जाऊन लस देखील घेता येणार आहे.
भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबवत आहे. या मोहिमेत जुलै पर्यंत सुमारे २५ कोटी नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. भारतात लसीकरणासाठी ॲस्ट्राझेनेकाने तयार केलेली आणि सिरम इन्स्टिट्युट तर्फे उत्पादन केले जात असलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या दोन लसींचा वापर केला जात आहे. सरकारी निर्देशांनुसार लसींच्या दोन डोस मध्ये २८ दिवसांचे अंतर राखले जात आहे. भारतात आत्तापर्यंत सुमारे ४ कोटी लोकांना किमान पहिला डोस देण्यात आला आहे, तर ८० लाख लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे.