कोविड लसीचा तिसरा डोस घेणं गरजेचं आहे, असं मत अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांनी व्यक्त केलं आहे. दोन डोस घेतल्यानंतरही काही महिन्यानंतर लसीची कार्यक्षमता लसीचा प्रभाव कमी होऊन कोविड संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र, तिसरा ‘बुस्टर’ डोस घेतला तर कोविड संसर्गाचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो, अशी आकडेवारीच त्यांनी सादर केली. इस्रायलमध्ये तिसरा डोस दिल्यानंतर कशा पद्धतीने संरक्षण मिळतं याचे दाखलेही त्यांनी दिले. त्यामुळे कोविड लसीचे दोन नव्हे तर तीन डोस घेणं हे नित्याचंच होईल कारण तशीच गरज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमेरिकेत येत्या काही दिवसात (२० सप्टेंबरपासून) नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी सुरु आहे. त्याबाबतचं नियोजन पूर्ण झालं आहे. फायझर आणि मॉडर्ना लसीचा तिसरा डोस पूर्ण झाल्यानंतर आठ महिन्यांनी तिसरा डोस दिला जाणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय तेथील एफडीए लवकरच घेणार आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत जवळपास चार कोटी लोकांना कोरोनाबाधित झाले आहेत तर जवळपास साडेसहा लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. गेल्या महिन्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने आणि त्यातच मुलांमध्ये संसर्ग वाढू लागल्याने काहीसं चिंतेच वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत ३६ कोटी ७३ लाखांपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण झालं आहे. त्यातील १७ कोटींपेक्षा जास्त लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.
गेल्या काही दिवसापासून देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात कोरोनाच्या ४२ हजार ६१८ नवीन रुग्णांची भर पडली असून ३३० लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात एकूण ३६ हजार 385 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधी शुक्रवारी ४५,३५२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर ३६६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
हे ही वाचा:
भारताने गाठला परकीय चलन साठ्याचा उच्चांक
बोरिवलीत इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग, जीवितहानी टळली
गौहत्या करणाऱ्या जावेदला इलाहाबाद उच्च न्यायालयाने फटकारले
उत्तर प्रदेशात पुन्हा उमलणार कमळ, काँग्रेस गमावणार पंजाबची सत्ता
देशातील चार लाख पाच हजार ६८१ इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण ६७ कोटी ७२ लाख ११ हजार २०५ डोस देण्यात आले आहेत. केरळमध्ये कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या वाढत असून काल एकाच दिवसात त्या ठिकाणी २९ हजार ३२२ रुग्णांची भर पडली आहे तर १३१ जणांचा मृत्यू झाला.