‘पुष्पा’ चित्रपटाची क्रेझ अजूनही आहे. चित्रपटाचे संवाद आणि नृत्य याची लोकप्रियता सोशल मीडियावर अजूनही प्रचंड आहे. मात्र, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनाही या सिनेमाची मदत होईल असे कधी वाटलेही नसेल. नंदुरबारमध्ये अशी घटना घडली आहे. ‘पुष्पा’ नावामुळे दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
नंदुरबाद मधील शहादा तालुक्यातील डांबर खेडा येथील हरचंद कोळी यांचे पन्नास हजार रुपये दोन फेब्रुवारी रोजी चोरी गेले होते. एका हॉटेलवर ते पाणी पिण्यासाठी थांबले असता त्यांचे पैसे चोरीला गेले. त्यांनी घडलेल्या घटनेची पोलिसात तक्रार दाखल केली होती. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळाली त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास सोपवला.
गुप्त माहितीद्वारे कोळी यांचे पैसे चोरणाऱ्या चोराची हेअर स्टाईल फारच वेगळी असल्याची माहिती समोर आली. या आरोपीने डोक्यावर इंग्रजीत ‘पुष्पा’ नाव कोरलेली हेअर स्टाईल केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या टीमने तपास केला असता एका हेअर सलूनवर तळोदा येथील विनोद पवार या इसमाने पुष्पा नाव कोरलेल्याची पोलिसांना माहिती मिळाली.
हे ही वाचा:
एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा
जो बायडन यांचा रशियाला गंभीर इशारा
‘मला तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा राहिलेली नाही’
…. म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने दिली टेबल टेनिस फेडरेशनच्या कामकाजाला स्थगिती
या माहितीच्या आधारे तळोदा तालुक्यातील छोटा धनपूर येथे जाऊन तपास करून पोलिसांनी विनोद पवारला अटक केली. तर दुसरा आरोपी राजू मोहाचेला देखील धनपूर येथून अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरीचा गुन्हा कबूल केला.
अवघ्या आठ दिवसात आरोपींचा शोध लावून सदर रक्कम हस्तगत करण्यात आली आणि ती मूळ मालकाच्या सुखरूप ताब्यात देण्यात आली आहे. फक्त हेअरस्टाइलच्या आधारे चोरीचा छडा लावणाऱ्या तळोदा पोलिसांवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.