चिपळुणातील धनगर कुटुंबाची व्यथा
हौशी बावधने संध्याकाळच्या भाकरीच्या गडबडीत होत्या. एकीकडे भाकरी चुलीवर शेकत होती, ओली लाकडे पेटवण्याचा प्रयत्न सुरू होता, फुंकणीने चुलीतले निखारे फुलवत होत्या तर घराबाहेर पती रामचंद्र बावधने म्हशी बांधत होते. तेवढ्यात पाण्याचा लोंढा आला आणि सगळे होत्याचे नव्हते झाले. घरातले सगळे वाहून गेले. त्या धावपळीत हौशीबाई पाण्याच्या लोंढ्यामुळे चुलीवर पडल्या आणि पाठ भाजून निघाली. चिखलामुळे त्यांना उठताही येत नव्हते.
चिपळूणमधील धनगरपाडा, खडपोली येथे घडलेली ही घटना. चिपळूणला पावसाने झोडपून काढले तेव्हाची. २० वर्षांपासून रामचंद्र आणि हौशी बावधने हे धनगर जोडपे इथे राहात आहे. जंगलातल्या समस्यांमुळे २० वर्षांपासून चार म्हशी, ४० कोंबड्या चार पाच बकऱ्या घेऊन उदरनिर्वाह करत होते. पण तिवरे येथून वाहत येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे त्यांची ही अवस्था झाली. सगळा संसार उद्धवस्त झाला. रोजगाराची सगळी साधने संपुष्टात आली. वाडा, घर जमीनदोस्त झाले. जनावरे वाहून गेली. त्यांना आता हे घर उभारायचे आहे. पण यांचे गंभीर नुकसान झाले आहे, अशी माहिती तेथील स्थानिक पत्रकार व सह्याद्री संवर्धन आणि संशोधन संस्थेचे पदाधिकारी संजय सुर्वे यानी दिली.
हे ही वाचा:
लसीकरण पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा का नाही? उच्च न्यायालयाचा सवाल
ठोसे बसले…टाके निघाले…पण सतीश लढत राहिला!
१५ ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्री भेटले नाहीत तर ‘मातोश्री’ समोर आत्मदहन
‘बिर्याणी’चे पोस्टमॉर्टेम करा!
स्थानिकांकडून हौशीबाईंवर आता औषधोपचार केले जात आहेत. ही जखम भरून येईलही पण पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या संसारामुळे मनावर झालेली जखम कशी भरून येईल. हे धनगर कुटुंब भातशेती करते. वार्षिक भातशेतीचे त्यांचे व या विभागातील अनेकांचे उत्पन्न नष्ट झाले आहे. नदीलगतच्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांनाही नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी होते आहे.