टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळायला आलेला प्रत्येकजण सुवर्णपदक जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावत आहे. इटलीचा गियानमार्को टॅम्बेरी आणि कतारचा मुताझ इसा बारशिम या दोघांनाही उंच उडीमध्ये सुवर्णपदक जिंकायचे होते. दोघेही त्यासाठी कडवा संघर्ष करत होते. शेवटी दोघांनाही सुवर्ण मिळाले. कसा झाला हा चमत्कार?
हे दोघेही उंच उडीत सुवर्ण मिळविण्यासाठी धडपडत होते. दोघांनीही उंच उडी मारली आणि ती झेप होती २.३७ मीटर. प्रश्न निर्माण झाला आता काय करायचे. कारण त्यानंतरची २.३९ मीटरची उडी मारण्याचा आणि सुवर्ण जिंकण्याचा दोघांनीही प्रयत्न केला. पण दोघांनाही ते शक्य झाले नाही. आता तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर हा तिढा सोडवायचा असेल तर पुन्हा एकदा उडी मारून विजेता निश्चित करा किंवा मग सुवर्ण विभागून घ्या. पण तेवढ्या कतारच्या बारशिमने त्या अधिकाऱ्याला थांबवत सांगितले की, दोन सुवर्णपदके मिळू शकतील का? तो अधिकारी आणखी स्पष्टीकरण देण्याआधीच बारशिमने टॅम्बेरीशी हात मिळविला आणि स्टेडियममधील उपस्थित क्रीडाचाहत्यांमध्ये एकच जल्लोष झाला. टॅम्बेरीला तर अश्रु आवरणे कठीण झाले. त्याने ट्रॅकवरच लोळण घेत आपल्या आनंदाश्रुंना वाट मोकळी करून दिली.
बारशिम आणि टॅम्बेरी हे दोघेही प्रतिस्पर्धी पण दोघेही उत्तम मित्रही. २०१०मध्ये हे दोघेही कॅनडातील स्पर्धेत एकत्र खेळले त्यानंतर आजपावेतो ते आमनेसामने येतच आहेत.
बारशिम या लढतीनंतर म्हणाला की, सुवर्णपदक विभागून घ्यायचे हे ठरविल्यानंतर मी त्याच्याकडे पाहिले. त्याने माझ्याकडे पाहिले आणि आम्हाला कळून चुकले की, आता पुढे काही बोलण्याची गरज नाही. तो माझा उत्तम मित्र आहे. केवळ मैदानात नाही तर मैदानातही. आम्ही एकत्रच मेहनत घेतली आहे. ते स्वप्न आज पूर्ण झाले. ही खिलाडुवृत्ती आहे. आम्हाला हाच संदेश इथे द्यायचा होता.
जगभरात १ ऑगस्ट हा मैत्रिदिन साजरा केला जातो. बारशिम आणि टॅम्बेरी यांनी हा मित्रदिन अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्याबद्दल जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.