“हिट अँड रन प्रकरणातील कुणालाही सोडणार नाही”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्ट

“हिट अँड रन प्रकरणातील कुणालाही सोडणार नाही”

शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा याने मुंबईत बीएमडब्ल्यू गाडीने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा हिट अँड रनच्या घटनेचा उल्लेख समोर आला आहे. यावर आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुण्यानंतर आता मुंबईतील वरळी भागात एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शिवसेना पक्षाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह ही गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबधीचं एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी राज्यातील वाढत्या हिट अँड रन प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोस्ट केली आहे. “महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने अत्यंत चिंतेत आहे. शक्तिशाली आणि प्रभावशाली लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून व्यवस्थेत फेरफार करतात. माझ्या सरकारकडून न्यायाचा असा गैरफायदा सहन केला जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये ‘हिट अँड रन’ च्या घटनांमध्ये कोणालाही न सोडता कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. सर्वसामान्य नागरिक हे आमच्यासाठी सर्वांत जास्त महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हिट अँड रनसारखी प्रकरणे अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि पीडितांना न्याय मिळाला यासाठी राज्य पोलीस विभागाला निर्देश दिले आहेत. या प्रकरणांमध्ये दोषी कोणीही असो त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, याव्यतिरिक्त, आम्ही कठोर कायदे आणि हिट अँड-रन गुन्हेगारांसाठी कठोर दंडांची अंमलबजावणी करत आहोत,” असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे कंट्रोल रूममध्ये

पंतप्रधान मोदी रशिया, ऑस्ट्रिया दौऱ्यासाठी रवाना; रशियातील भारतीयांशी साधणार संवाद

इस्रायलचा गाझातील शाळेवर हवाई हल्ला, १६ जणांचा मृत्यू !

पावसाने मुंबईला झोडपलं; रेल्वेसेवा खोळंबली, रस्ते वाहतूक धीम्या गतीने

“मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही, मग तो श्रीमंत असो, प्रभावशाली असो, किंवा नोकरशहा किंवा मंत्र्यांची संतती असो, कोणत्याही पक्षाशी संबंधित असो, त्याला सूट मिळणार नाही. यासाठी शून्य सहिष्णुता धोरण असून प्रशासन पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व नागरिकांसाठी सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version