अंदमानच्या जंगलात मिळाले म्यानमारच्या सहा शिकाऱ्यांचे मृतदेह!

उपसमारीने मृत्यू झाल्याचा संशय

अंदमानच्या जंगलात मिळाले म्यानमारच्या सहा शिकाऱ्यांचे मृतदेह!

अंदमान निकोबारमधील नारकोंडम बेटावर म्यानमारमधील सहा शिकाऱ्यांचे मृतदेह आढळले आहेत. रविवारी एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. सर्व शिकाऱ्यांचा मृत्यू उपासमारीमुळे झाला आहे. ते जेव्हा येथे पोहोचले, तेव्हा त्यांच्याकडील खाण्या-पिण्याचे साहित्य संपले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हे शिकारी छोट्या होडीतून येथे आले असावेत. मात्र त्यांच्या होडीत बिघाड झाल्यामुळे ते परतू शकले नसावेत. त्यांचा मृत्यू अन्नाचा एकही कण आणि पाण्याचा एकही थेंब न मिळाल्यामुळे झाला असावा, अशी शक्यता अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. शनिवारी छोट्या नारकोंडम बेटावरील जंगलकिनारी काही मीटर अंतरावर हे मृतदेह आढळले. भारताच्या पूर्वेकडील भागामध्ये स्थित उत्तर आणि मध्य अंदमान जिल्ह्यांतील नारकोंडम हे बेट म्यानमारच्या कोको बेटापासून केवळ १२६ किमी दूर आहे. हे बेट ज्वालामुखीने बनले आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने हे बेट सुप्त ज्वालामुखी असल्याचे म्हटले आहे. सुमारे ७.६ चौरस किमी क्षेत्रात पसरलेले हे बेट म्यानमारच्या शिकारींचे शिकारीसाठी आवडते ठिकाण आहे.

१४ फेब्रुवारी रोजी अंदमान पोलिसांनी एका शोधमोहिमेदरम्यान नारकोंडम बेटावरून दोन म्यानमारी शिकारींना पकडले होते. त्यांना पोर्ट ब्लेअरला आणून सीआयकडे सुपुर्द केले होते. चौकशीदरम्यान त्यांना त्यांनी त्यांच्या देशाचे आणखी सहा शिकारी नारकोंडमच्या जंगलात लपले असल्याचे सांगितले. त्यानंतर लगेचच अंदमान पोलिसांचे एक शोधपथक कामाला लागले आणि त्यादरम्यान त्यांना हे सहा मृतदेह सापडले. त्यांच्या मृतदेहांवर कोणत्याही जखमा नाहीत. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतरच समजेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

माजी मंत्री रजनी सातव यांचे निधन

भारताचा इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय

काका पुतण्याचे संबंध कसे असावेत? रितेश देशमुखांनी सांगितली आठवण

संदेशखाली हिंसाचार:टीएमसी नेते शिबू हाजरांना ८ दिवसांची पोलिस कोठडी!

 

दोन वर्षांत १००हून अधिक शिकाऱ्यांना अटक
गेल्या दोन वर्षांत म्यानमारच्या १००हून अधिक शिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून समुद्री काकडी (सी कुकुंबर) आणि टर्बो स्नेल जप्त करण्यात आले आहेत.

अंदमानमध्ये का घुसतात शिकारी?
शिकारी मुख्यत्वे समुद्री काकडी (सी कुकुंबर) आणि टर्बो स्नेल यांना मिळवण्यासाठी अंदमान निकोबारमध्ये घुसतात. समुद्री काकड्या सध्या संकटात आहेत. या समुद्री काकड्या समुद्रतळाशी जमा होणारे कुजके पदार्थ खाऊन समुद्रतळ स्वच्छ राखण्यासाठी मदत करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात याचा उपयोग औषधीय उपयोगासाठीही केला जातो. तर, अनेक आशियाई देशांमध्ये शोपीस, दागिने आणि बटणासह सजावटीसाठी टर्बो स्नेलचा वापर केला जातो.

Exit mobile version