पुणे शहरात रस्त्यांच्या विस्तार करण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे भविष्यात शहरामध्ये हवेत चालणाऱ्या बसेस आणाव्या लागतील. यासंदर्भात आपल्याकडे प्रेझेंटेशन असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील कार्यक्रमात केले. शनिवार, १२ ऑगस्ट रोजी पुण्यातील चांदणी चौकातील नवीन पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
पुण्यातील रस्ते विस्तारासाठी जागाच शिल्लक नाहीत. त्यामुळे भविष्यात हवेत चालणाऱ्या बसेस आणाव्या लागतील. माझ्याकडे त्याचं प्रेझेंटेशन आहे. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी हा प्रकल्प बघून घ्यावा, असे गडकरींनी सांगितले. पुण्याला पेट्रोल, डिझेलपासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदूषण कमी होईल. त्यासाठी इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. भारतातून पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करायचे आहे.
इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. आपण स्वत: दिल्लीत हायड्रोजनवर चालणारी कार वापरतो असे नितीन गडकरी म्हणाले. पुण्यात प्रदूषण खूप वाढले आहे. त्यामुळे पुणे अजून वाढवू नका, शहराला मोकळा श्वास घेऊ द्या, पुण्याला जुने दिवस आणा, असे आवाहन त्यांनी बोलताना केले.
पुणे शहराच्या विस्तारासाठी आता जागा शिल्लक नाही. त्यामुळे इथे अतिरिक्त लोकसंख्या देखील समायोजित होऊ शकत नाही. तेव्हा पुणे आता अधिक वाढवून आणखी प्रदूषित करु नका, असे गडकरींनी सांगितले. लहान असताना माझ्या बहिणीकडे स्वारगेटला रहायला यायचो तेव्हा पर्वतीवरुन गार हवा येत होती. परंतु, आता ही हवा हरवली आहे. पुणे सर्वाधिक प्रदूषित शहर झाले आहे.
हे ही वाचा:
आता फसवणुकीसाठी ‘४२०’ नव्हे ‘३१६’ कलम
सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटनाला चालना देणार
श्रीनगर एअरबेसवर मिग- २९ लढाऊ विमानांचा स्क्वॉड्रन तैनात
जया प्रदा यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास, पाच हजारांचा दंड; काय आहे प्रकरण?
मंत्र्यांच्या ताफ्यात असणाऱ्या वाहनांचे सायरन काढणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केलीये. लवकरच कर्णकर्कश हॉर्न ऐवजी मधूर आणि सुरेल भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवण्यात येणार आहे. चांदणी चौकातल्या पुलाचे उद्घाटन केले असले तरी त्याचे नाव अद्याप ठरलेले नाही. चांदणी चौकातल्या पुलाचे नाव हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून ठरवावे. एकमताने ठरवाल त्या नावाला अनुमती देईन, अशी ग्वाही त्यांनी दिली.