‘बॅगेत कपडेच आहेत, युरीन पॉट नाही’

मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला, पालघरमध्ये झाली बॅगेची तपासणी

‘बॅगेत कपडेच आहेत, युरीन पॉट नाही’

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून सुरु असलेल्या बॅग तपासणीवर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी झाल्यानंतर हा मुद्दा अधिक चर्चेत आला. खरे तर, तपासणी करणे हे निवडणूक अधिकाऱ्यांचे कामच आहे, मात्र केवळ विरोधकांच्याच बॅगा तपासल्या जातात, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. ठाकरेंनी यासंदर्भात एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर पोस्ट केला. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंच्या  बॅगेची देखील तपासणी झाली आणि यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंनी यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगांची देखील तपासणी झाल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. याच दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याचा देखील व्हिडीओ समोर आला आहे. आज (१३ नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर येथील शिवसेना उमेदवाराच्या सभेसाठी गेले असता त्यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत कोणतीही आडकाठी न करता या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केल्याचे समोर आले.

बॅगांची तपासणी सुरु असताना मुख्यमंत्री शिंदे अधिकाऱ्यांना म्हणाले, बॅगेत केवळ कपडेच आहेत. युरीन पॉट वगैरे काही नाहीये, असा टोला मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला. तसेच तपासणी करणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे, त्यांना त्यांचे काम करू द्या, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हे ही वाचा : 

इंदिरा गांधी स्वर्गातून आल्या तरी ३७० कलम परत येणार नाही!

जम्मू-काश्मीरमध्ये ११९ दहशतवादी सक्रिय, बहुतांश पाकिस्तानी!

हिंदुहितासाठी, राष्ट्रहितासाठी करा १०० टक्के मतदान !

हा तर बालीशपणा, उद्धव ठाकरेंच्या प्रचारांवर बंदी आणावी!

दरम्यान, उद्धव ठाकरे वणी येथे सभेसाठी पोहोचले होते, तेव्हा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ शूट करत, बॅगच काय युरीन पॉट पण तपासा असे म्हटले होते. यावरून मुख्यमंत्री शिंदेनी ठाकरेंना टोला लगावला.

 

Exit mobile version