नाट्यगृहे सुरू करण्याचा निर्णय दोन महिने आधीच

नाट्यगृहे सुरू करण्याचा निर्णय दोन महिने आधीच

Empty theatre hall with stage, red curtain and seats, 3D rendering

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स, मॉल्स काही निर्बंधांसह सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरु करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आला नव्हता. आता ठाकरे सरकारने नाट्यगृह, सिनेमागृह उघडण्यास परवानगी दिली असली तरी ही परवानगी तब्बल दोन महिन्यांनी दिली आहे. ठाकरे सरकार कोणताही निर्णय घेण्यात चालढकल करत असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात असताना हा निर्णय मात्र चक्क दोन महिने आधीच घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

५० टक्क्यांच्या मर्यादेसह ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. नाट्यक्षेत्रातील काही मान्यवर कलाकारांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी नाट्यगृह सुरु करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसा आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना देण्यात आला आहे. सध्या तिसऱ्या लाटेची भीती सरकारकडून सातत्याने दाखविली जात आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्याही नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान आहे. लोकांनी शिस्त पाळली नाही तर लॉकडाऊन लावावा लागेल, असे इशारेही दिले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरू होतीलच, याची काय खात्री असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चेसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद मच्छिन्द्र कांबळी, प्रवक्ते मंगेश कदम, मराठी नाट्यव्यासायिक निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष भरत काणेकर, रंगमंच कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर वेल्ले, विजय केंकरे, रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी विजय राणे उपस्थित होते. आदेश बांदेकर आणि सुबोध भावे यांनी ही भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. या सगळ्यांच्या उपस्थितीत नाट्यगृहे सुरु करण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय.

हे ही वाचा:

पॅरालिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक

रिलायन्स उद्योगाला लाभली नवी ऊर्जा

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेपर्यंत निवडणुका नकोत

अनिल देशमुखांना भगौडा घोषित करा, संपत्ती जप्त करा

राज्यातील नाट्यगृह उघडण्यासाठी ९ ऑगस्टला रंगकर्मी-रंगधर्मींचं आंदोलन झालं. वारंवार विनंती-आर्जवं करणारे लोककलावंत, रंगकर्मी, सिनेधर्मी ही सगळी मंडळी रस्त्यावर उतरली. मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात हा जागर झाला, ही अत्यंत महत्वाची घटना होती. कारण, गेल्या १५ महिन्यांपासून सांस्कृतिक क्षेत्राला लागलेला ब्रेक काही केल्या जात नव्हता. अटी-शर्तींसह का असेना पण हे सांस्कृतिक क्षेत्र काही प्रमाणात तरी खुलं करा ही त्यातली मुख्य आणि एकमेव मागणी होती. आक्रोश त्याबद्दलचा होता. जगणं किती कठीण झालं आहे याकडे सरकारचं लक्ष वेधून घेणं हा उद्देश होता आणि त्यानंतर सरकारकडून ठोस काहीतरी हाती लागेल अशी अपेक्षा होती. उशीरा का होईना नाट्यगृह सुरु होत असल्याने नाट्यकर्मींनी समाधान व्यक्त केलं आहे. मागील वर्षभरापासून नाट्यकलाकार आणि या संदर्भातील मंडळी नाट्यगृह सुरु करण्याची मागणी करत होते. अखेर हा निर्णय घेण्यात आल्याने आता आमची रोजीरोटी सुरु होईल, अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version