२२ ऑक्टोबरपासून तिसरी घंटा आणि लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन…

२२ ऑक्टोबरपासून तिसरी घंटा आणि लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन…

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर राज्य सरकारकडून निर्बंध शिथिलीकरणाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (२४ सप्टेंबर) राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा, तर ७ ऑक्टोबरपासून मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला. तसेच आज (२५ सप्टेंबर) घेतलेल्या निर्णयानुसार २२ ऑक्टोबरपासून राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे खुली होणार आहेत.

कोरोना काळामध्ये इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे नाट्यक्षेत्र आणि चित्रपट क्षेत्रालाही चांगलीच आर्थिक झळ पोहचली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे या क्षेत्राची घसरलेली आर्थिक गाडी पुन्हा रुळावर यायला मदत होणार आहे. राज्य सरकारकडून मिळालेली ही दिवाळी भेट असल्याची प्रतिक्रिया नाट्य आणि चित्रपट सृष्टीतून व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील चित्रपटगृहे २२ ऑक्टोबरपासून कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.

पेन स्टुडिओचे अध्यक्ष आणि एमडी डॉ. जयंतीलाल गडा आणि दिग्दर्शक -निर्माता रोहित शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा केली. या बैठकीला टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा:

जामीन हवाय तर द्या अर्धा लिटर दूध, कपडे धुवा, इस्त्री करा…

मर्केल यांच्यानंतर जर्मनीच्या चॅन्सेलर कोण?

लग्नासाठी १५ स्थळे सुचविण्याचे वचन तोडले; भरावे लागले ५५ हजार

भारतातील ‘हे’ रेल्वे स्थानक चालते १००% सौर उर्जेवर!

सरकारच्या निर्णयाचा आनंद आहे. कोरोना काळात नाट्यगृहे बंद असल्यामुळे रंगकर्मींची वाईट अवस्था झाली होती. त्यांच्या आताच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास त्यांना मदत होईल, असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. निर्माते, दिग्दर्शक सर्वच जण इतके दिवस संभ्रमात होते की चित्रपटगृहे कधी सुरू होणार आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस कसे आणायचे. आता तयारीसाठी एक महिना आहे. लवकरात लवकर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, असे निर्माता व दिग्दर्शक रवी जाधव यांनी सांगितले.

Exit mobile version