भारतीय वायूदलाचे एक विमान एएन- ३२ हे जवळपास सात वर्षांपूर्वी अचानक गायब झाले होते. सर्वच रडारवरून हे विमान गायब झाले होते. या विमानाचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम देखील राबविण्यात आली होती. तेव्हा जवळपास २८ जहाज आणि एक मोठी पाणबुडी या मोहिमेत काम करत होते. पण या विमानाचा काहीच थांगपत्ता लागला नव्हता. आता अखेर सात वर्षांनंतर या विमानाचे अवशेष चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यापासून तब्बल ३०० किलोमीटर आत समुद्राच्या तळाशी सापडले आहेत. आता या विमानाचा अपघात कसा झाला याचा शोध घेतला जात आहे.
चेन्नईतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशियन टेक्नोलॉजी म्हणजेच NIOT ही संस्था समुद्रातील अनेक संशोधन प्रकल्प राबवत असते. अशाच एका अंडरवॉटर व्हेईकल अर्थात एयूव्हीची चाचणी करत असताना त्यांना एएन-३२ चे काही अवशेष सापडले. नॉर्वेहून आयात करण्यात आलेली ही एयूव्ही यांनी पहिल्यांदाच चाचणी करण्याच्या हेतूने समुद्रात जवळपास ३४०० मीटरपर्यंत खोलपर्यंत नेली होती.
यावेळी त्यांना पाण्याखाली काही अवशेष आढळून आले. एखाद्या जहाजाचे अवशेष असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रवीचंद्रन म्हणाले की, “सर्वात पहिली गोष्ट दिसली ती म्हणदे एक गोलाकार पत्र्याचा तुकडा, त्यावर तीन रंगांचं चिन्ह दिसत होतं. NIOT च्या लोकांनी जेव्हा पहिल्यांदा ते पाहिलं, तेव्हा त्यांना वाटलं हे एखाद्या जहादाचे अवशेष असावेत. आसपासच्या भागाचंही निरीक्षण करण्यात आलं. आणखी काही धातूचे तुकडे आढळून आले. आम्ही त्याची छायाचित्रं भारतीय नौदल आणि भारतीय वायूदलाला पाठवली. शेवटी वायूदलाने ते त्यांच्याच विमानाचे अवशेष असल्याची पुष्टी केली.” यामुळे घटनांचा उलगडा होत गेला.
हे व्हेईकल विमानाचे अवशेष शोधण्यासाठी म्हणून खास तिथे पाठवण्यात आली नव्हती. याआधीही अशा प्रकारच्या चाचण्या झालेल्या आहेत. पण, यावेळी हे व्हेईकल जास्तच खोल समुद्रात गेले होते त्यामुळे हे अवशेष दिसून आले, असंही रवीचंद्रन यांनी सांगितले.
हे ही वाचा:
‘ही तर पवित्र स्वप्नाची परिपूर्ती’
वर्षभरात अयोध्येत ३१ कोटी पर्यटक, प्राणप्रतिष्ठेनंतर महापूर!
‘न्यायालयाचा आदेश सहन करू शकत नाही’… मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठचे पत्र
जय श्रीराम: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावणार हुतात्मा कारसेवकांच्या कुटुंबियांना
प्रकरण काय?
२२ जुलै २०१६ रोजी भारतीय वायूदलाच्या एएन-३२ या विमानानं चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला जाण्यासाठी उड्डाण केलं. पण उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच या विमानाचा सर्व रडारशी संपर्क तुटला. विमानामध्ये २९ जण होते. विमान बेपत्ता झाल्यानंतर तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. त्यासाठी मोठ्या संख्येनं मनुष्यबळ, नौदलाची जहाजं, पाणबुडी या सगळ्यांची मदत घेण्यात आली होती. मात्र, अनेक दिवस शोध घेतल्यानंतरही या विमानाचा पत्ता लागला नाही. अखेर आता या विमानाचे अवशेष आढळले आहेत.