आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम किल्ले रायगडवर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रात आले असून यावेळी भाषण करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विचार मांडले. त्यांनी जिजाऊ माँ साहेबांनाही वंदन केले.
अमित शाह म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी आहे. मी शिवचरित्र वाचलं आहे. जिजाऊ माँ यांनी केवळ शिवाजी महाराजांना जन्म दिला नाही, तर स्वराज्य, स्वधर्म, समग्र देशाला एकत्र आणि स्वतंत्र करण्याचा विचार दिला. तसेच हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची प्रेरणाही जिजाऊ माँ साहेबांनी शिवाजी महाराजांना दिली. त्यामुळेच मी माँ साहेबांना अभिवादन करत आहे” असं अमित शाह म्हणाले. महाराजांच्या सिंहासनाला अभिवादन करताना माझ्या मनातील भाव मी सांगू शकत नाही. महाराजांच्या सभेत मी आज उभा आहे. मला हे वर्णन शब्दात सांगता येत नाही” असं अमित शाह म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माच्यावेळी महाराष्ट्र अंधकारात बुडाला होता. स्वराज्याची कल्पनाही कुणी करत नव्हतं. स्वधर्म आणि स्वराज्य याबाबत बोलणं लोक गुन्हा समजू लागले होते. पण शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, भगवा फडकवण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. आजवर अनेक नायकांची चरित्रं वाचली आहे. मात्र असं साहस आणि दृढ इच्छाशक्ती, अकल्पनीय रणनीती मी एकाही व्यक्तीमध्ये पाहिलं नाही, असं अमित शाह म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांकडे धन नव्हतं, भूतकाळ त्यांच्यासह नव्हता, भविष्याबाबत काही माहिती नव्हतं. मात्र स्वराज्य या संकल्पनेतून त्यांनी ते निर्माण करुन दाखवलं आणि पाहता पाहता १०० वर्षांपासून सुरु असलेली मोगालाई संपुष्टात आणून दाखवली. अटकपर्यंत मावळे गेले. कटकपर्यंत गेले. बंगालपर्यंत गेले. दक्षिणेत कर्नाटकापर्यंत गेले. तेव्हा देश आता स्वतंत्र होईल असं लोकांना वाटलं. आज स्वातंत्र्यानंतर आपण त्यांच्यामुळेच जगात मान वर करून उभं राहतो असंही अमित शाह म्हणाले.
अमित शाह पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रातल्या लोकांना हात जोडून विनंती करतो की शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. देश आणि सगळं जग शिवरायांपासून प्रेरणा घेत आहे. आपण गुलामीच्या मानसिकतेत गेलो होतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्याचा सूर्य दैदिप्यमान केला. मी जेव्हा इथे भाषण करायला किंवा राजकारण करायला आलो नाही. मला शिवरायांच्या स्मृतींची अनुभूती व्हावी म्हणून आलो आहे,” असं अमित शाह म्हणाले.
हेही वाचा..
बाकुची : औषधी गुणांनी भरलेली वनस्पती
ऊर्जा क्षेत्रावर केंद्रित जीसीसीमध्ये मोठी वाढ
मुजफ्फरपूरमध्ये पती ठरला हैवान
“छत्रपतींचा राज्याभिषेक झाला तो हाच रायगड किल्ला. ज्या किल्ल्यावर छत्रपतींनी अखेरचा श्वास घेतला तो किल्लाही हाच. ही पवित्र भूमी आपल्याला इतिहास सांगणारी आहे. ही पवित्र भूमि शिवस्मृती करण्यासाठी मी लोकमान्य टिळकांचेही आभार मानतो. इंग्रजांनी रायगड किल्ला जाणीवपूर्वक तोडण्याचं काम केलं. कारण हा किल्ला वर्षानुवर्षे स्वराज्याचं प्रतीक होतं. दीर्घ काळ गुलामीत ठेवण्यासाठी हे प्रतीक तोडण्यात आलं मात्र लोकमान्य टिळकांनी या स्मारकासाठी कष्ट घेतले,” असं अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले.