नोएडा येथे उभारलेले बेकायदेशीर सुपरटेक ट्विन टॉवर आज इतिहासजमा होणार आहेत. रविवार २८ ऑगस्टला दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी हे ट्विन टॉवर पाडण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अनियमित बांधकामामुळे हे टॉवर्स पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आज दुपारी हायटेक तंत्रज्ञानाच्या मदतीने ३२ मजली ट्विन टॉवर जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. भर वस्तीत असलेले हे टॉवर पाडताना अनेक आव्हानं असणार आहेत.
कसे पाडणार ट्वीन टॉवर?
या इमारत पडण्यासाठी ९ हजार ६४० खड्डे तयार करण्यात आले आहेत. त्यात ३ हजार ७०० स्फोटकं पेरण्यात आली आहेत. योग्य वेळी बटन दाबले की नऊ सेकंदात पत्त्यांच्या घराप्रमाणे हे टॉवर कोसळणार आहेत. दुखापत आणि सुरक्षेसाठी आसपासच्या लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हे टॉवर उभे करायला तेव्हा ७० कोटी खर्च आला होता पण आता या इमारती पाडण्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सुमारे तीन वर्षात तयार झालेले हे टॉवर अवघ्या ९ सेकंदात जमीनदोस्त होणार आहेत. हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी ४६ जणांची टीम काम करत आहे. हे टॉवर्स पाडल्यानंतर ३० मीटर उंचीपर्यंत ढिगारा तयार होईल, अशी शक्यता आहे. तर हा ढिगारा हटवण्यासाठी सुमारे तीन महिने लागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धूळ पसरणार असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फायबर शीट्स बसवण्यात आल्या आहेत. तर झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांना काळ्या पांढऱ्या हिरव्या चादरीनं झाकण्यात आलं आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तान ‘बुडाला’ आणीबाणी जाहीर
मुंबई नाही, तर इथे आहे एकनाथ शिंदेंचं मुख्य कार्यालय
नीरजने रचला इतिहास, डायमंड लीग जिंकणारा नीरज पहिला भारतीय
‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट
ट्विन टॉवर पाडताना आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या छतावर आणि बाल्कनीत जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच ३१ ऑगस्टपर्यंत ट्विन टॉवर्सच्या आजूबाजूचा परिसर नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे. शिवाय घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. तर रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात असणार आहेत.