दिल्लीतील मुंगेशपूर भागात मंगळवारी देशातील सर्वाधिक ५२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे सांगणाऱ्या भारतीय हवामान खात्याने २४ तासांत कोलांटउडी मारली. ४८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेले हरयाणातील रोहतक हे देशातील सर्वांत उष्ण शहर होते, असा खुलासा ‘आयएमडी’ने केला होता. आता गुरुवारी, ३० जून रोजीही नागपूरमध्ये तापमान ५६ अंश सेल्सिअसवर पोहोचले, असे सांगण्यात आले. मात्र, सेन्सरमध्ये बिघाड झाल्याने चुकीचे तापमान नोंदवले गेल्याचे स्पष्टीकरण हवामानशास्त्र विभागाने दिले आहे.
अधिक तापमान कुठे नोंदले गेले?
नागपूर शहरात तीन ते चार स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. एक केंद्र उत्तर अंबाझरी मार्गावरील रामदास पेठमधील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या २४ हेक्टर मोकळ्या मैदानात आहे. दुसरे सोनेगाव परिसरात आहे. तिसरे आणि चौथे केंद्र खापरी आणि रामटेक परिसरात आहे. शहरातील रामदासपेठ आणि सोनेगाव केंद्रांवर गुरुवारी क्रमशः ५६ व ५४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही वेळातच ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली.
हवामानशास्त्र विभागाने दिले स्पष्टीकरण
याबाबत हवामान विभागाच्या नागपूर केंद्राने स्पष्टीकरण दिले आहे. सेन्सरमध्ये बिघाड झाल्याने अधिक तापमान नोंदवले गेले. नागपूर क्षेत्रीय केंद्राचे वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी सांगितले की, गुरुवारी सेन्सरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे केंद्राने चुकीच्या तापमानाची नोंद केली. त्यानंतर हा बिघाड दुरुस्त करण्यात आला.
हे ही वाचा:
लंडनमध्ये ठाकरेंना घाम फुटणार, निवडणूक आयोग करणार कारवाई
लोकसभा निवडणुकीदरम्यान ११०० कोटी रुपयांची रोकड, दागिने जप्त
एअर इंडियाच्या विमानात आठ तास एसीशिवाय; प्रवासी बेशुद्ध झाले
ब्रिटनमधून सोन्याची घरवापसी; ब्रिटनकडून रिझर्व्ह बँकेने १०० टनांहून अधिक सोनं आणलं
स्वयंचलित हवामान केंद्राची माहिती विश्वासार्ह नाही
हवामानतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंचलित हवामान केंद्रांची माहिती कधीही विश्वासार्ह नसते. ३८ अंश सेल्सिअसनंतर या केंद्रातून अचूक तापमान मिळण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे भारतातील तापमानाची अधिकृत नोंद हवामान विभागाच्या अधिकृत केंद्राकडूनच घेतली जाते. ही व्यवस्था विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी स्वतः सांभाळतात. त्यामुळे या केंद्रातून हवामानशास्त्र केंद्राच्या वतीने जाहीर तापमानाची माहिती चुकीची असण्याची शक्यता खूप कमी आहे.