दिशाभूल जाहिरातीच्या प्रकरणावरून पतंजली आयुर्वेदाचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. दिशाभूल जाहिरातीच्या प्रकरणात बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांचा दुसरा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असून त्यांचा माफीनामा स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
यावेळी न्यायलयाने म्हटले आहे की, “तुम्ही न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले असून कारवाईला सामोरे जा. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणे अयोग्य असल्याचा संदेश समाजात जाणे गरजेचे आहे,” अशी टिपणी खंडपीठाने केली आहे.
याआधी २ एप्रिलला झालेल्या सुनावणीवेळी पतंजलीच्यावतीने माफीनामा सादर करण्यात आला होता. यावरुन न्यायालयाने पतंजलीला फटकारले होते. तसेच सुनावणीची पुढील तारीख दिली होती. या सुनावणीच्या आधीच एक दिवस म्हणजे ९ एप्रिलला पतंजली आयुर्वेदाचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांनी पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर करत दुसऱ्यांदा माफी मागितली होती. मात्र, हा माफीनामा न्यायालयाने फेटाळला आहे. न्या. अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
हे ही वाचा:
इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या नेत्याचे तीन मुलगे ठार
शुभमन गिल, राशिद खान यांनी साकारला गुजरातचा विजय
ओवेसिंच्या विरोधात कॉंग्रेस उमेदवार देणार नाही
कायद्याचे उल्लंघन केलेल्या पतंजली आयुर्वेदवर कारवाई करण्यात उत्तराखंड सरकार अपयशी ठरल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला होता. याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून काढून टाका, असेही न्यायालयाने म्हटले.
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करू नका, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २१ नोव्हेंबर २०२३ रोजी पतंजली आयुर्वेदला दिले होते. मात्र, त्यानंतरही या जाहिराती सुरू होत्या, असा आक्षेप ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’कडून (आयएमए) घेण्यात आला होता.