राज्यातील अग्निवीरांची सोय राज्य सरकार करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

राज्यातील अग्निवीरांची सोय राज्य सरकार करणार

पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची राहण्याची आणि नाश्त्याची सोया जिल्हा प्रशासनामार्फत करावी. तसेच त्याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून यासंदर्भात मागणी केली होती.

अग्निवीर भरतीच्या चाचणीवेळी एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांना शासनाकडून सुविधा मिळण्याबाबतची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेत गैरसोय होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.

भरतीसाठी आलेले अनेक तरुण हे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील असतात. लांब अंतरावरून भरतीसाठी हे तरूण येतात. त्यांची त्याठिकाणी गैरसोय होऊ नये याकरिता ज्या जिल्ह्यांमध्ये अशी भरती चाचणी होईल, तेथील जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषद किंवा महापालिका शाळांमध्ये या तरुणांची राहण्याची सोय तसेच नाश्ता, आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी बिश्नोईच्या भाच्याला अटक

सोनाली फोगट हत्येप्रकरणातील बदनाम ‘कर्लिस बार’ सील

“दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं काय आहे?”

एकनाथ शिंदे यांच्यामुळे मेट्रो धावणार आहे

दरम्यान, केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा करताच या योजनेला विरोध करण्यासाठी काही राज्यांमध्ये तरुणांनी निषेध नोंदवला होता. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. मात्र अग्निपथ योजनेला पाठिंबा देण्यासाठी देशातील मोठमोठे उद्योग समूह पुढे आले होते. अग्निपथ योजनेला केवळ समर्थनच नव्हे, तर अग्निवीरांना त्यांच्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले आहे.

Exit mobile version