२० जूनपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील सुपर आठ फेरीतील सामन्यांत भारताचे फिरकीपटू कमाल दाखवतील, असा विश्वास भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा याने व्यक्त केला आहे. भारताचा सुपर आठमधील पहिला सामना बार्बोडोस येथे अफगाणिस्तानविरुद्ध होत आहे.
गटसाखळीमध्ये भारताने आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेवर विजय मिळवून सुपरआठमध्ये प्रवेश केला आहे. तर, कॅनडाविरुद्धचा शेवटचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. अफगाणिस्तानही आतापर्यंत अपराजित राहिले आहे. त्यांनी युगांडा, न्यूझीलंड आणि पपुआ न्यू गिनीआ यांच्याविरुद्ध विजय नोंदवला आहे. त्यांचा गटसाखळीतील शेवटचा सामना आता वेस्ट इंडिजविरोधात होईल.
‘वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्या धीम्या आणि कोरड्या आहेत. त्यामुळे मधल्या षटकांत फिरकीपटूंना याचा फायदा घेता येईल,’ असे जाडेजा यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले. ‘जेव्हा केव्हा आम्ही वेस्ट इंडिजमध्ये खेळतो, तेव्हा खेळपट्टी थोडी मंद आणि कोरडी असते. सामन्याची वेळही सकाळची असते. त्यामुळे त्याचा फायदा फिरकीपटूंना होईल. भारतातही अशा अनेक खेळपट्ट्या आहेत, जिथे फिरकीपटूंना फायदा होतो. त्यामुळे मधल्या षटकांत फिरकीपटूंना फायदा होईल, ही चांगली बाब आहे. ‘डेथ ओव्हर’मध्येही फिरकीपटूंना खेळवले जाईल,’ असे जाडेजाने सांगितले.
हे ही वाचा:
‘मैतेई-कुकी समाजाशी केंद्र सरकार चर्चा करणार’
राहुल गांधींकडून रायबरेलीची निवड; प्रियांका वायनाडमधून निवडणूक लढवणार
महाराष्ट्रात सुरू झालाय ‘फेक नरेटीव्ह सिझन-२
कुलदीप यादव यानेही जडेजाच्या मताला दुजोरा दिला. गोलंदाजांचा टप्पा टी २० क्रिकेट सामन्यात महत्त्वाचा ठरणार आहे.
‘वेस्ट इंडिजमध्ये फिरकीपटूंना फायदा होतो. त्यामुळे भारताच्या आताच्या संघात फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला असावा, असे मला वाटते. टी २० प्रकारात गोलंदाजांचा टप्पा हा महत्त्वाचा भाग असतो. मी गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरोधात टी २० मालिका खेळलो आहे. ही मालिका फिरकीपटूंसाठी लाभदायक ठरली होती. त्यामुळे आताही तशाच खेळपट्ट्या असतील, अशी आशा कुलदीपने व्यक्त केली. भारताचा पुढील सामना अफगाणिस्तान (२०जून), बांगलादेश (२२ जून) आणि ऑस्ट्रेलिया (२४ जून)विरुद्ध रंगणार आहे.