बिपरजॉय आणि मान्सूनचे आगमन यामुळे गणपतीपुळ्यातील समुद्राला उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळाले. समुद्राच्या पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकल्याने दुकानदारांना फटका बसला. दुकानात पाणी शिरून सामान तसेच दुकानदारांचे पैसे वाहून गेले. तसेच पर्यटकांचे सामान आणि मोबाइल फोन समुद्राने आपल्या पोटात ओढून घेतले. तर काहींना गंभीर दुखापतही झाली आहे.
गणपतीपुळे येथे पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पर्यटक अतिउत्साह दाखवत खोल समुद्रात उतरतात आणि जीव धोक्यात घालतात. बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाण्यात उतरू नका, अशा सूचना जाहीर केल्या होत्या. परंतु सूचनांचे पालन न करता मुलाबाळांसह पाण्याचा आस्वाद घेण्यालाठी पर्यटक पाण्यात उतरले होते. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होऊन एका अजस्त्र लाटेत रविवारी १० ते १५ पर्यटक जखमी झाले आहेत. जखमीत बायकांचे प्रमाण अधिक आहे. त्यांना रुग्णवाहिका, स्वतःच्या वाहनातून, रिक्षा यातून उपचारासाठी प्राथमिक उपचार केंद्र, मालगुंड तर काहींना रत्नागिरीतील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
हेही वाचा : ‘
संस्कारी, देशप्रेमी, सुदृढ बाळ हवंय, मग रामायण वाचा’
… म्हणून शुभमन गिलला भरावा लागणार दंड!
बृजभूषण सिंह म्हणतात, २०२४ची निवडणूक लढवणार, लढवणार, लढवणारच!
रॅम्प वॉक करताना लोखंडी खांब कोसळला; २४ वर्षीय मॉडेलचा मृत्यू
मोठ्या लाटा धडकू लागल्या
अजस्त्र लाटांनी गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याची दाणादाण उडवली आहे. सलग दोन दिवस गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याला भरतीचा फटका बसलेला आहे. समुद्राच्या किनाऱ्यावरती पाच ते साडेपाच मीटरहून अधिक उंचीच्या लाटा धडकत आहेत. पाण्याची वाढलेली पातळी पाहता आता गणपतीपुळ्याचा समुद्र किनारा बंद करण्यात आलेला आहे. पर्यटकांना समुद्र किनारी मज्जाव घालण्यात आलेला आहे.
समुद्र किनारी १० ते १५ जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. समुद्रात न उतरण्याच्या सूचनाही स्पीकरवर देण्यात येत आहेत. समुद्रात उतरल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचनाही देण्यात येत आहेत. जोपर्यंत समुद्र शांत होत नाही, तोपर्यंत पर्यटकांना प्रशासनाने समुद्रकिनारी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. समुद्राचे पाणी गणपतीपुळ्यातील संरक्षक भिंतीपर्यंत आल्याचे चित्र होते. गणपतीपुळ्यातील समुद्र हा धोकादायक मानला जातो. येथे जास्त प्रमाणात कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, पुणे येथील पर्यटक भेट देतात. पर्यटकांना समुद्राचे आकर्षण जास्त असल्यामुळे हे अतिउत्साही पर्यटक खोल पाण्यात जाऊन जीव धोक्यात घालतात, असे स्थानिक देवरूख यांनी सांगितले.