‘वसई-विरारकरांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यात मेहत्तर समाजाची भूमिका महत्त्वाची आहे. या समाजातील बहुतांश स्त्री-पुरुष नगर परिषद काळापासून आजपर्यंत सफाई कर्मचारी म्हणून वसई-विरारकरांना सेवा देत आहेत. पण हा ‘स्वच्छतादूत`च आज अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या समाजाला आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवणे, हे पालिकेचे कर्तव्य आहे. या ‘स्वच्छतादूतां`ची काळजी वाहणे, ही पालिकेची पर्यायाने आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या समाजातील कर्मचाऱ्यांच्या समस्या-अडचणी सोडवण्यास भाजप कटिबद्ध आहे,` अशा शब्दांत भाजप वसई विधानसभा संघटक मनोज पाटील यांनी मेहत्तर समाजातील सफाई कर्मचाऱ्यांना ठाम आश्वस्त केले.
दिवाळीनिमित्त वसई भाजपच्या वतीने वंचित/ आदिवासी समजाच्या पाडे /वस्त्यांना भेट देऊन लहान मुलांना खाऊ व मिठाई वाटप करून सर्वांची दिवाळी गोड करण्यात येत आहे. या अनुषंगाने भाजप कार्यकर्त्यांनी रविवार ( 12 नोव्हेंबर) व सोमवारी (13 नोव्हेंबर) वसई येथील लक्ष्मी चाळ या ‘सफाई कर्मचारी वसाहती`ला भेट दिली होती. या सस्नेह भेटीत पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांना भेडसावत असलेल्या अनेक समस्या-अडचणी विधानसभा संघटक मनोज पाटील यांना अवगत करून दिल्या.
वसई-विरार महापालिकेत सेवा देत असलेले सफाई कर्मचारी लक्ष्मी चाळ या वसाहतीत अनेक वर्षांपासून राहत आहेत. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनीही नगर परिषद काळापासून वसई-विरारकरांना सफाई कर्मचारी म्हणून सेवा दिलेली आहे. परंतु हे सफाई कर्मचारी अनेक समस्या आणि अडचणींना आज तोंड देत आहेत. सफाई कर्मचारी राहत असलेले लक्ष्मी चाळ जीर्णावस्थेत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसमोर निवाऱ्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही या वसाहतीतील रहिवाशांना रोज संघर्ष करावा लागत असल्याची खंत या कर्मचाऱ्यांनी मनोज पाटील यांच्याकडे व्यक्त केली. सुविधांच्या नावे पालिका त्यांच्या पगारातून 5300 रुपये कापून घेते. पण पिण्याच्या पाण्यासाठी साधा ‘स्टँड पोस्ट` देण्याची तसदीदेखील पालिकेने घेतलेली नाही, अशी वेदनाही या कर्मचाऱ्यांनी मनोज पाटील यांना सांगितली.
दरम्यान; भाजप वसई विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवघर येथील कातकरी वस्ती, दिवाणमान डोंगरी आदिवासी पाडा,वसई-दत्तधाम आदिवासी पाडा, दत्तधाम कुष्टरोग वसाहत आणि वाघरी पाड्यालाही भेट दिली आणि या वंचित-निराधारांचीही दिवाळी गोड केली. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याही नागरी समस्या-अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी कुष्टरोग वसाहतीलाही पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागत असल्याचे अनेक रुग्णांनी सांगितले. तर वाघरी पाडाही अनेक मूलभूत सुविधांपासून आजही वंचित असल्याचे येथील रहिवाशांनी भाजप कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
हे ही वाचा:
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या दोन गटाच्या कार्यकर्त्यांत धूमश्चक्री
मातोश्री-२मध्ये शिवभोजन थाळीचा हातभार किती?
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना पाच दिवसांची पोलीस कोठडी
ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत, आता विजेतेपदासाठी भारताशी गाठ
सामान्य व वंचित घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी वसई भाजपच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन मनोज पाटील यांनी या भेटीत सर्व रहिवाशांना दिले आहे. या प्रसंगी त्यांच्या सोबत वसई मंडळ सरचिटणीस अमित पवार, कल्पना खरपडे, प्रीतम राऊत, मन्मीत राऊत, प्रतीक चौधरी, नवघर मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर, सिद्धेश तावडे, बाळा सावंत, संकल्प राऊत आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.