बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उद्या (९ डिसेंबर) महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला अद्याप कर्नाटक सरकारने परवानगी दिलेली नाही. तसेच या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समिती हा महामेळावा घेण्यावर ठाम आहे. दरम्यान, महामेळाव्याला परवानगी नाकारलेल्या कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी टीका केली आहे. सीमाभागाचा प्रश्न सुटता कामा नये ही काँग्रेसची भूमिका असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.
उदय सामंत म्हणाले, कर्नाटकामध्ये काँग्रेसचे सरकार आहे आणि सीमाभागाचा प्रश्न सुटका काम नये ही काँग्रेसची पहिल्या दिवसापासूनही भूमिका आहे. तशी भूमिका कायस्वरूपी ठेवून काँग्रेसचे सरकार काम करतय.
सीमाभागा हा महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे अशी महाराष्ट्र एकीकरण समितीचे मागणी आहे, याची याचिका दाखल आहे, याचा निकाल आला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राचे सरकार सीमाभागातील लोकांच्या पाठीशी आहे. जर महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली असेल तर याचा मी निषेध करतो, असे सामंत म्हणाले.
यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ८६८ गावांमध्ये मराठी बोलणारे भाषिक आहेत. यासाठी अनेक वर्ष मराठी भाषिक लोक आवाज उठवत आहेत, आंदोलने करत आहेत. याला कारणीभूत नेमण्यात आलेला महाजन आयोग आहे, आयोगाने त्यावेळी योग्य पद्धतीने निर्णय दिला नाही, असे हसन मुश्रीफ म्हणाले. (महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमधील सीमावाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारने महाजन आयोगाची स्थापना केली होती.)
हे ही वाचा :
मविआच्या नेत्यांना निवडणुकीपुरते संविधानाची आठवण, शपथविधी सोहळ्यात सिद्ध केले!
शरद पवार महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत!
दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कोल्हापुरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक उद्या बेळगावकडे जाणार आहेत. मात्र, नेहमीप्रमाणे या सगळ्यांना कर्नाटक पोलिसांकडून सीमेवरच अडवले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे कर्नाटक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीने या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांना निमंत्रण दिल्याची माहिती आहे.