राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी राष्ट्रपतींनी कोल्हापूरच्या आई अंबाबाईचं दर्शन घेतले. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले. कोल्हापुरातील वारणानगर येथील श्री वारणा महिला सहकारी समुहाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात राष्ट्रपती मुर्मू यांनी सहभाग घेतला. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रपतींनी वारणा समूहाचे कौतुक केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी सर्वप्रथम कोल्हापूर शहरातील आई महालक्ष्मीच्या मंदिराला भेट दिली. आई महालक्ष्मी देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधिवत पूजा राष्ट्रपतींनी केली. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगेसह आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुढील दोन दिवस राज्यातील विविध कार्यक्रमातही त्या सहभागी होणार आहेत.
देवी महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून मंदिराविषयी माहिती जाणून घेतली, तसेच मंदिरातील दगडी झुंबर व शिल्पकलेची पाहणी केली. देवीच्या किरणोत्सवाची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी त्यांना दिली. देवीचे दर्शन झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाधान व्यक्त केले. श्री अंबाबाई मंदिराच्या इतिहासात प्रथमच भारताच्या राष्ट्रपती यांनी श्री अंबाबाई मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदी उद्यापासून ब्रुनेई-सिंगापूर दौऱ्यावर !
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड
पश्चिम बंगाल: विशेष अधिवेशनात मांडणार विधेयक; बलात्काराच्या दोषींना १० दिवसांत फाशी