भारताचे महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान ३’ चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले ते ठिकाण ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखले जाणार आहे. चंद्राच्या ज्या ठिकाणी ‘चांद्रयान २’ने आपल्या पाऊलखुणा ठेवल्या आहेत, ते ठिकाण आता ‘तिरंगा’ म्हणून ओळखले जाईल. हा तिरंगा पॉइंट भारताच्या प्रत्येक प्रवासाचे प्रेरणास्थान होईल. कोणतेही अपयश अखेरचे नसते, प्रयत्न करणे सोडून द्यायचे नसते, ही शिकवण हा तिरंगा पॉइंट देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. तसेच, २३ ऑगस्ट हा यापुढे ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून साजरा केला जाईल, अशीही घोषणा मोदी यांनी यावेळी केली.
चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर प्रथमच मोदी यांनी बंगळुरूमधील इस्रोच्या मुख्यालयाला भेट दिली. पंतप्रधान मोदी दोन देशांच्या दौऱ्यानंतर शनिवारी मायदेशी परतले. त्यानंतर ते थेट बंगळुरूला रवाना झाले. तिथे त्यांनी वैज्ञानिकांची भेट घेऊन त्यांना ‘सॅल्युट’ करून मोहीम यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
चार वर्षांपूर्वी जेव्हा चंद्रयान २ चंद्राच्या जवळ पोहोचले होते, तिथे त्याने त्याच्या पाऊलखुणा उमटवल्या होत्या, ते ठिकाण आता ‘तिरंगा’ म्हणून तर चांद्रयान- ३ चे मून लँडर जिथे उतरले ते ठिकाण आजपासून ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखले जाईल, असे नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.
‘मेक इन इंडिया’ तंत्रज्ञान चंद्रापर्यंत पोहोचवल्याबद्दल मोदी यांनी वैज्ञानिकांचेही कौतुक केले. ‘एकेकाळी भारताजवळ आवश्यक ते तंत्रज्ञान नव्हते. आपली गणना तिसऱ्या जगामध्ये केली जात असे. मात्र आज भारत जगभरातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. या प्रवासात इस्रोसारख्या भारतीय कंपन्यांचा मोठा वाटा आहे. आज तुम्ही ‘मेक इन इंडिया’ला चंद्रापर्यंत पोहोचवले, अशा शब्दांत मोदी यांनी वैज्ञानिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
हे ही वाचा:
प्रशांत कारुळकरांच्या उपस्थितीत झाली जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या अमृतमहोत्सवी जन्मोत्सवाची घोषणा
भारतात होणाऱ्या G२० परिषदेला व्लादिमीर पुतीन अनुपस्थित ?
भारताचे तिघे भालाफेकीच्या अंतिम फेरीत
मध्य प्रदेशात ‘हिंदुत्वा’च्या अजेंड्यामुळे काँग्रेसमध्ये कलह
‘आज भारताच्या तरुण पिढीमध्ये विज्ञान, अंतराळ विज्ञान आणि कल्पकता आदी ऊर्जा ठासून भरली आहे. यामागे मंगळयान आणि चांद्रयानाच्या यशस्वी मोहिमांचा सहभाग आहे. आज भारतातील छोट्याछोट्या मुलांच्या तोंडी चांद्रयानाचे नाव आहे. आज भारतातील प्रत्येक मूल या वैज्ञानिकांमध्ये स्वत:चे भविष्य पाहात आहे. तरुण पिढीला सातत्याने प्रेरणा मिळावी, यासाठी भारताने केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीचा दिवस म्हणजेच २३ ऑगस्ट यापुढे ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून ओळखला जाईल,’ अशी घोषणा मोदी यांनी केली.