कावड यात्रेच्या मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानावर नावे लिहिण्याचा आदेश भाविकांच्या तक्रारींनंतरचं!

उत्तर प्रदेश सरकारचे सर्वोच्च न्यायालयात उत्तर

कावड यात्रेच्या मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानावर नावे लिहिण्याचा आदेश भाविकांच्या तक्रारींनंतरचं!

उत्तर प्रदेशातील कावड यात्रेच्या निमित्ताने तेथील दुकानांवर मालकांची नावे लिहिण्याच्या उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या आदेशांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. सरकारच्या निर्णयावर आता उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, दुकाने आणि भोजनालयांच्या नावांमुळे झालेल्या गोंधळाबाबत कावड यात्रेतील सहभागी लोकांकडून आलेल्या तक्रारींनंतर राज्याने जारी या सूचना केल्या आहेत. ‘एनडीटीव्ही’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

उत्तर प्रदेशात प्रसिद्ध अशा कावड यात्रेला सुरुवात झाली असून कावड यात्रेसंबंधित नवा नियम सरकारकडून जारी करण्यात आला होता. या आदेशानुसार, कावड यात्रेच्या मार्गावरील प्रत्येक खाद्यपदार्थाच्या दुकानाच्या किंवा हातगाडीच्या मालकाला आपले नाव फलकावर लिहावे लागणार होते, जेणेकरून या यात्रेदरम्यान कोणताही नवा वाद निर्माण होऊ नये. यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये आणि त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होऊ नयेत शिवाय कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. पण, याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.

यावर आता उत्तर प्रदेश सरकारने न्यायालयाला उत्तर दिले आहे. दुकाने आणि भोजनालयांच्या नावांमुळे झालेल्या गोंधळाबाबत कावड यात्रेतील सहभागी लोकांकडून आलेल्या तक्रारींनंतर राज्याने जारी या सूचना केल्या होत्या. पोलीस अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंच्या चिंता दूर करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई केली. तसेच सरकारने म्हटले आहे की, राज्याने अन्न विक्रेत्यांच्या व्यापारावर किंवा व्यवसायावर कोणतेही निर्बंध किंवा प्रतिबंध लादलेले नाहीत (मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीवरील बंदी वगळता) आणि ते त्यांचा व्यवसाय पूर्वीप्रमाणे करण्यास मोकळे आहेत. ⁠मालकांची नावे आणि ओळख दाखविण्याची आवश्यकता ही पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि यात्रेतील कोणताही संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी केवळ अतिरिक्त उपाय आहे. या प्रकरणी शुक्रवार, २६ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

हे ही वाचा:

कारगिल विजय दिवस: २५ वर्षांपूर्वी पाकिस्तानला चारी मुंड्या चित करून भारताने ‘कारगिल’ जिंकले!

पुण्यातील पूरस्थितीत बचावकार्यासाठी लष्कराचे जवान मैदानात

अनिल देशमुख पुरावे द्या, ३ तासाच्या आत तुमच्याही ऑडियो क्लिप्स जनतेसमोर आणू !

विहार व मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागले

प्रकरण काय?

गेल्या सोमवारपासून श्रावण महिना सुरू झाला. या पवित्र काळात शंकराला जल अर्पण करण्यासाठी भाविक कावड वाहून अनेक किलोमीटरचा प्रवास करतात. या प्रवासादरम्यान ते अनेक दुकाने आणि ढाब्यांमधून खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू खरेदी करतात. उत्तर प्रदेश सरकारने या दुकानांवर मालकांची नावे लिहिण्याचा आदेश जारी केला होता, जेणेकरून भाविक त्यांच्या आवडीच्या दुकानातून वस्तू खरेदी करू शकतील, त्यानंतर उत्तराखंड सरकारनेही असाच आदेश जारी केला.

Exit mobile version