राज्यात पावसाळयाला सुरुवात झाली असून पुण्यात मात्र झिका व्हायरसचा शिरकाव झाला आहे. दिवसेंदिवस झिका व्हायरसचा संसर्ग वाढत असून पुण्यातील झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता सातवर पोहोचली आहे. यानंतर आता महापालिकेची यंत्रणा अलर्ट झाली असून झिकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इनडोअर फॉगिंग करण्यात येत आहे.
पुण्यात झिकाचा धोका वाढताना दिसत आहे. डासांपासून हा आजार पसरत असल्याचं पाहायला मिळतंय. ऐन वारीच्या तोंडावर झिकाचे सात रुग्ण आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हा व्हायरस सहसा आफ्रिका, अमेरिका आणि दक्षिण भारतात आढळतो. मात्र, लागण झालेल्या रुग्णांनी कुठेही प्रवास केलेला नाही, त्यामुळे झिका पुण्यात आला कुठून हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
पुण्यात झिकाची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाला संसर्ग कुठून झाला, याचे उत्तर अद्याप आरोग्य यंत्रणेला सापडत नसल्यामुळे कम्युनिटीत झिकाचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये ४६ वर्षांचा डॉक्टर आणि त्याच्या १५ वर्षांच्या मुलीला झिकाचं निदान झालं आहे. तर, मुंढवा येथे ४७ वर्षांची एक महिला आणि तिच्या २२ वर्षांच्या मुलालाही झिकाचं निदान झाल्याचं समोर आलं आहे. एरंडवणे येथील दोन गर्भवतींना आणि कोथरूडच्या एकाला झिकाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. महापालिकेकडून प्रादुर्भाव रोखण्यासाठी इनडोअर फॉगिंग करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बलिवंत यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप; सेन्सेक्सची ८०,००० पार उसळी
अमरनाथ यात्रेकरूंसाठी लष्कराचे जवान बनले देवदूत; ब्रेक फेल झालेल्या बसला थांबवण्यात यश
बांसुरी स्वराज यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; राहुल गांधींच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी
सभागृहात शिवीगाळ करणाऱ्या अंबादास दानवेंचे निलंबन
झिका व्हायरसची लक्षणं कोणती?
ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अंगावर पुरळ उठणे अशी काही लक्षणे झिका व्हायरसची आहेत.