आधी आपल्या राष्ट्रीय नेत्याचं लग्न तर लावा!

भाजपा नेते धनंजय मुंडेंचा टोला

आधी आपल्या राष्ट्रीय नेत्याचं लग्न तर लावा!

राज्याच्या विधानसभेची तारीख जवळ आली असून २० तारखेला एकाच टप्प्यात मतदान होणार तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी-विरोधक-अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. याच काळात उमेदवारांकडून जनतेला वेगवेगळी आश्वासने दिली जातात, तसेच विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारावर टीकाही केली जात आहे. याच दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराने जनतेला दिलेल्या आश्वासनाची जोरदार चर्चा होत आहे. मात्र, यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या उमेदवाराला चांगलाच टोला लगावला आणि नाव न घेता राहुल गांधींना लक्ष्य केले आहे.

राज्यातील इतर मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघावर सर्वांची नजर आहे. एकीकेडे विरोधात लढणारे भाऊ-बहिण यंदाच्या निवडणुकीत एकत्रित आले आहेत. महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे मैदानात आहेत. तर त्यांच्या विरोधात मविआतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजसाहेब देशमुख उभे आहेत. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरु आहे. याच दरम्यान, राजसाहेब देशमुख यांनी प्रचारसभेत केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

हे ही वाचा : 

विधानसभा निवडणुकीसाठी मदत करण्याचे उलेमांचे उबाठा नेत्यांना आश्वासन

मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही

५० लाख रुपये दे नाहीतर… शाहरुख खानला धमकी!

काँग्रेसमधील बंडखोरांना सहा वर्षांसाठी टाटा, बाय-बाय

राजसाहेब देशमुख प्रचारसभेत म्हणाले, तरुण पोरांना लग्नासाठी विचारताना लोक विचारतात, पोराला नोकरी आहे का विचारतात. सरकारच देत नाही तर कशी लागणार. काही उद्योगधंदा आहे का? पालकमंत्र्याचाच उद्योगधंदा नाही तर पोरांचा कसा असेल. यामुळे सर्व पोरांचे लग्न होणे अवघड झाले आहे. त्यामुळे सगळ्या पोरांना मी आश्वासन देतो, जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देऊ असं अजब आश्वासन राजसाहेब देशमुख दिले. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी टोला लगावला. ज्या पक्षात तुम्ही होता त्याच पक्षातील राष्ट्रीय नेत्याचं अद्याप लग्न लागलेलं नाही आणि आता हे म्हणतात सर्वांची लग्न लावून देतो, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले आहे.

Exit mobile version