मुंबई जवळील मीरा- भाईंदर शहरात एका परिसरातील बस थांब्याला बांगलादेश नाव दिल्याचे समोर येताच खळबळ उडाली आहे. मीरा- भाईंदर महानगरपालिकेने हा कारभार केला असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. भाईंदर पश्चिम येथील उत्तन चौक भागात या नावाचा बस थांबा उभारण्यात आला आहे.
भाईंदर पश्चिम येथील उत्तन-चौक भागात पालिकेने बांगलादेश नावाचा बस थांबा उभा केला आहे. पूर्वी परराज्यातून आलेले विस्थापित नागरिक येथे राहत असल्यामुळे बांग्लादेश असे टोपण नाव या परिसराला पडले होते. मात्र, आता पालिकेने थेट परिवहन बस थांब्यावर नाव टाकल्याने येथील नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.
भाईंदर पश्चिमेला उत्तन हा समुद्र किनाऱ्या लगतचा परिसर आहे. या ठिकाणी मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असून मच्छिमार कोळीबांधवांची घरेही आहेत. कामानिमित्त येथे मजूर पश्चिम बंगालमधून मोठ्या प्रमाणात आले होते. भाईंदरच्या पाली- चौक येथे ही वस्ती अधिक होती. यांची भाषा ही बंगाली असल्याने या ठिकाणाला बांगलादेश वस्ती असं संबोधू लागले आणि ही बोली भाषा प्रचलित झाली.
हे ही वाचा:
संगमनेरमध्ये ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतराचा प्रयत्न
युगांडामध्ये इसिसशी संबंधित संघटनेकडून शाळेवर दहशतवादी हल्ला
प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीसमोर झुकले
मणिपूर अजूनही धुमसतेच, १० हजारांहून अधिक घरे पेटली
हा परिसर बांगलादेश नावानेच ओळखला जातो आणि या बांगलादेश वसाहतीमधील नागरीकांच्या आधार कार्ड, लाईट बिल आणि पालिकेच्या घरपट्टीवरही बांग्लादेश असं नाव लिहलं गेलं. तेव्हाही मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आता बस थांब्यालाच बांगलादेश असं नाव दिलं गेलं. त्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाने याची लवकर दखल घेऊन हे नाव बदलावे अशी मागणी केली आहे.