पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काही दिवसांपूर्वी तनिषा भिसे या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. राज्यभरातून या गोष्टीचा संताप व्यक्त केला जात असताना राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली होती. दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दीनानाथ रूग्णालयाने त्यांचीच एक समिती नेमून या मृत्यूप्रकरणात रूग्णालयाची चूक नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राज्य शासनाचा दीनानाथ रुग्णालयात घडलेल्या प्रकरणी आता चौकशी अहवाल समोर आला असून यात या प्रकरणी रूग्णायावर ठपका ठेवण्यात आला आहे, त्याचबरोबर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चौकशी अहवालाबाबत माहिती दिली. या अहवालानुसार रुग्णालय दोषी आढळले असून रुग्णालयाने कोणतेही नियम पाळले नसल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टी समोर आणल्या आहेत. रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, “भिसे कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणताही रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यानंतर चांगल्या उपचारांसाठी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी शेअर करतो. या रुग्णाचे उपचार डॉक्टर घैसास यांच्याकडे सुरू होते, १५ मार्च रोजी रुग्ण आणि डॉक्टरांची पहिली भेट झाली होती. यावेळी डॉक्टरांनी रुग्णाची संपूर्ण हिस्ट्री सांगण्यात आली होती. रुग्णाची मेडिकल हिस्ट्री केवळ डॉक्टरला माहिती होती. पण घटना घडल्यानंतर दिनानाथ रुग्णालयाने चौकशीसाठी स्वतःची समिती नेमली आणि स्वतःला वाचवण्यासाठी रुग्णाच्या वैयक्तिक आयुष्याच्या गोपनीय गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या. त्याचा निषेध असून याबाबत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला समज दिली जाईल. यावर कुटुंबाने आक्षेप घेतला असून तसं लेखी पत्र आयोगाला दिलं आहे. तसेच यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.”
पुढे त्यांनी म्हटले आहे की, “पेशंटला डॉक्टरांनी २ तारखेला बोलावलं होतं. पण ब्लिडिंग होतय म्हणून पेशंट २८ तारखेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेला. ९ वाजून १ मिनिटांची एन्ट्री दिसत आहे. पेशंटचा डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी संबंधित स्टाफला सूचना दिली. डिलिव्हरीची ऑपरेशनची तयारी करा. पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्याआधी १० लाखांची मागणी करण्यात आली. त्यावर कुटुंबाने आता तीन लाख रुपये आहेत ते घ्या. पुढच्या दोन-चार तासात किंवा उद्यापर्यंत व्यवस्था करतो असं सांगितलं. संबंधित रुग्णालयाला विविध विभागांकडून मंत्रालयातून फोन गेले. पण रुग्णालयाने कोणतीच दखल घेतली नाही,” असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
पुढे पेशंट २.३० वाजता रुग्णालयातून बाहेर पडला. पेशंट साडेपाचतास रुग्णालयात असताना हॉस्पिटलमध्ये कोणतेही उपचार झाले नाहीत. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला. रक्तस्त्राव रोखण्यासाठी डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की, तुमच्याकडे औषध असतील तर घ्या. हे सर्व पेशंटसमोर घडत होतं यातं पेशंटची मानसिक स्थिती खालावली होती. त्यानंतर पेशंटला सूर्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांनी लगेच उपचारासाठी आतमध्ये घेतलं” अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
हे ही वाचा..
“मला तुरुंगवासही होऊ शकतो” ममता बॅनर्जी असं का म्हणाल्या?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लठ्ठपणाबाबत व्यक्त केली चिंता
वक्फ विधेयकाचे समर्थन केले, भाजपा नेत्याचे घर पेटवले
भूकंपापूर्वीच इशारा देईल ‘भूदेव’ अॅप
रुग्णालयाने रुग्णावर उपचार करणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही हा ठपका रुग्णालयावर ठेवण्यात आलेला असून रुग्णालय दोषी आहे. रुग्णालयाने हलगर्जीपण केला आहे. रुग्णाला त्वरित उपचार दिले असते तर रुग्ण वाचला असता. राज्य समितीचा अहवाल आलेला आहे. तिन्ही समितीचे एकत्रित अहवाल आणि नातेवाईकांनी केलेली तक्रार यावर अंतिम निष्कर्ष होईल. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी सुद्धा याप्रकरणाचा बाबत बोलणे झालं आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. दोषींना पाठीशी घातले जाणार नाही त्यांच्या कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही रुपाली चाकणकर यांनी दिले आहे.