देशाचे राजधानीचे शहर असलेल्या दिल्लीतील प्रगती मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘भारत मंडपम’मध्ये शनिवार, ९ सप्टेंबर रोजी जी- २० शिखर संमेलनाला सुरुवात झाली. जी- २० शिखर परिषदेनिमित्त जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख, अध्यक्ष, पंतप्रधान हे भारतात अवतरले आहेत. यावेळी सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी सर्व देशांच्या मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर नरेंद्र मोदींनी जी- २० शिखर परिषदेच्या उद्घाटन समारंभात संबोधन केले. यावेळी नरेंद्र मोदींसमोर भारत असं नाव लिहिलेलं होतं. शिवाय मोदींकडून भारत असाच उल्लेख करण्यात आला.
भूकंपग्रस्त मोरोक्कोला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी भारत तयार
जी- २० शिखर परिषदेत संबोधनाला सुरुवात करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरोक्को येथील भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांपैकी संवेदना व्यक्त केल्या. “मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली आहे. या दुखःद प्रसंगी मोरोक्कोतील ज्यांनी आपले कुटुंबिय गमावले आहेत, त्याच्याप्रति संवेदना व्यक्त करत आहे. भारत या कठिण काळात मोरोक्कोला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अडीच हजार वर्षांपूर्वीच्या संदेशाने परिषदेला सुरुवात
नरेंद्र मोदी सुरुवातीला म्हणाले की, “जी- २० परिषदेत भारत सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. ज्या ठिकाणी आपण एकत्रित जमलो आहोत इथून काही किलोमीटर अंतरावर सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा एक स्तंभ आहे. या स्तंभावर प्राकृत भाषेत लिहिलं आहे की, “मानवतेचं कल्याण आणि सुख याला कायम प्राथमिकता असायला हवी.” अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीनं हा संदेश संपूर्ण विश्वाला दिला होता. या संदेशाची आठवण करुन आपण या जी २० संमेलनाला सुरुवात करुया.
‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’चा मंत्र
२१ व्या शतकाचा हा काळ संपूर्ण जगला नवी दिशा देणारा महत्वाचा काळ आहे. यासाठी आपल्याला मानवकेंद्रीत पद्धतीने आणि जबाबादारीनं पुढे पाऊल टाकायचं आहे. कोरोना नंतर विश्वासाचं मोठं संकट उभं राहिलं. युद्धाने हे विश्वासाचं संकट अधिक गडद केलं. जर आपण करोनाच्या संकटाशी लढा देऊ शकतो. करोनाला पराभूत करू शकतो तर आपल्यातील विश्वासाच्या संकटावरही मात करू शकतो. यासाठी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’चा हे सर्वांसाठी एक मार्गदर्शक ठरेल. जागतीक अर्थव्यवस्थेतील उलथापालथ, उत्तर-दक्षिण विभागणी असेल, पूर्व-पश्चिमेतील दूरी, अन्न-इंधन आणि खतांची व्यवस्था, दहशवाद आणि सायबर सुरक्षा, आरोग्य-ऊर्जा-पाणी सुरक्षा यावर येणाऱ्या पिढ्यांसाठी ठोस उपायांचा पर्याय निवडावा लागेल.
हे ही वाचा:
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सीआयडीकडून अटक
पाठीशी तीन भावंडे असलेला ‘गोविंदा’ झाला गंभीर जखमी, अर्धांगवायूने पीडित
बॉडी बॅग कथित घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांविरोधात ईडीकडून गुन्हा दखल
अफ्रिकन युनियनला स्थायी सदस्यत्व
नरेंद्र मोदींनी जी- २० मधील देशांकडे मोदींनी अफ्रिकन युनियनला स्थायी सदस्यत्व मिळावे असा प्रस्ताव ठेवला होता. याला सर्वांची सहमती आहे का? असा प्रश्न यावेळी मोदींनी विचारला. मोदींच्या प्रस्तावाला सर्वांनी संमती दिल्यानंतर मोदींनी आपल्याजवळील ‘गॅवल’ तीन वेळा वाजवून याला सर्वांची संमती असल्याचं जाहीर केलं. यानंतर संमेलनाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी मोदींनी अफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांना जी-२० तील स्थायी सदस्य म्हणून स्थान ग्रहण करण्याचं निमंत्रण दिलं.