मी फक्त मराठी नाही तर संपूर्ण भारतची कन्या आहे. माझे आईवडील, गुरु आणि लता दीदी यांचा मला आशीर्वाद आहे. म्हणून आज या ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया महाराष्ट्र शासनाने मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आहे, अशी प्रतिक्रिया ख्यातनाम गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केली आहे. गेल्या आठ दशकांपासून रसिकांना आपल्या सुरेल गाण्याची मोहिनी घालणाऱ्या आशाताई यांना राज्य सरकारच्यावतीने महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठेच्या मानला जाणारा हा पुरस्कार मिळाल्यावर गहिवरलेल्या आशाताईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गेटवे ऑफ इंडिया यथे सागराच्या साक्षीने ‘महाराष्ट्र भूषण २०२१’च्या पुरस्कार सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार आशाताई भोसले यांना प्रदान करण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, मंत्री सुधीर मुनगंटीवार, दीपकजी केसरकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, मंगेशकर कुटूंबातील सदस्य, संगीत-चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर यांच्यासह आशाताईंच्या अनेक चाहत्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
पुरस्काराला उत्तर देतांना आशा भोसले म्हणाल्या , महाराष्ट्रभूषण पुरस्कार स्वीकारताना मुलगी बऱ्याच दिवसांनी माहेरी आली की तिचं कौतुक होतं. तसं मला आज वाटतंय. मी महाराष्ट्राची मुलगी आहे आणि आज मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. गाण्यांनी माझे जीवन समृद्ध केले असून या वाटचालीत संगीतकार आणि सह गायकांना विसरू शकत नाही. तसेच सर्व प्रकारचे संगीत आपण ऐकले पाहिजे. आशा भोसले यांना सन २०२१ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे . शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अभिनेता अभिनेता सुमीत राघवन याने यावेळी आशाताई भोसले यांना बोलते करत भूतकाळात नेलं . आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देतांना आशाताई म्हणाल्या, कोल्हापुरात वयाच्या दहाव्या वर्षी १९४३ साली मी पहिलं गाणं गायलं. त्यावेळी मी प्रचंड घाबरले होते, मी थरथर कापत होते. असं वाटलं की हा कुणीतरी हातातला माईक घेऊन जावं, मला पळून जावं असं वाटलं होतं. तरीही मी त्या वेळी गायले. कारण पळून गेले असते तर घरच्यांनी मला मारलं असतं. १९४६ साली मी हिंदी फिल्म लाईनमध्ये गायला सुरुवात केली. त्यानंतर आतापर्यंत १० हजार गाणी गायली. संगीतप्रेमींनी माझं गाणं ऐकलंच नसतं तर मी येथपर्यंत आलेच नसते. असंच आपलं प्रेम राहू दे. अशा भावना व्यक्त केल्या.
एकवेळ सत्तेची खुर्ची मिळवणे सोपे असते पण …
एकवेळ सत्तेची खुर्ची मिळवणे सोपे असते पण आबालवृद्धांना आपल्या गाण्यांनी मंत्रमुग्ध करून त्यांच्या मनावर इतकी वर्षे अधिराज्य गाजवणे हे खरोखरच अलौकिक आहे .आशाताईंनी आयुष्यभर विविध भाषांतील गाणी गाऊन संगीत क्षेत्राची केलेली सेवा ही अलौकिक असून आपल्या सांगीतिक कारकिर्दीत तब्बल १२ हजार गाणी गाणे हा एक चमत्कारच आहे.आशाताईंचा स्वर हा एकाच वेळी देवापाशी हात जोडून उभे राहिल्यावर आणि घराबाहेर पडून मित्रांसोबत फिरताना ऐकला तरीही तेवढाच आनंददायक वाटतो. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याने या पुरस्काराची उंची वाढली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वेळी म्हणाले.
वर्सटाईल’ या शब्दाची व्याख्या ‘आशाताई भोसले
वर्सटाईल’ या शब्दाची व्याख्या ‘आशाताई भोसले’ ही आहे. ‘तोरा मन दर्पण’पासून ते ‘खल्लास’ ही त्यांची अफाट रेंज आहे. या रेंजमध्ये सगळ्या प्रकारची गाणी आहेत. त्यांचे वैशिष्ट सातत्याने त्यांनी जपले. २० भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. आज धन्य झालो. आशाताईंचा सत्कार करण्याची संधी मिळाली. १९५२ साली ‘गेट वे ऑफ इंडिया’ नावाच्या चित्रपटातील एका गाण्याच्या कोरसमध्ये आशाताई गायल्या होत्या. तिथून ते आज याच ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या साक्षीने त्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार स्वीकारताहेत हा थक्क करणारा प्रवास आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.