पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज पुण्यात होणार अंत्यसंस्कार

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज पुण्यात होणार अंत्यसंस्कार

ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे ४ जानेवारी रोजी ७५ व्या वर्षी पुण्यात दुःखद निधन झाले. सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज ५ जानेवारीला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी त्यांचे पार्थिव दोन तासांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार दफनविधी केला जाणार आहे.

अनाथांचा आधार असलेली माय अशी ओळख असणारी सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत अनाथ मुलांना वाढवले. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याआधी त्यांचे पार्थिव सकाळी ९ वाजता नोबल हॉस्पिटलमधून मांजरी येथे नेले जाणार आहे. त्यानंतर सकाळी ९ ते ११ पर्यंत मांजरीच्या बाल सदन संस्थेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल या भागात त्यांच्यावर महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले जातील.

हे ही वाचा:

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन

मुस्लिम लॉ बोर्ड म्हणते, सूर्यनमस्कार असंवैधानिक!

चिन्यांना प्रत्युत्तर; भारतीय सैन्याने गलवान खोऱ्यात फडकावला तिरंगा

उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या मॅरेथॉन रॅलीत चेंगराचेंगरी, मुले जखमी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या असून त्यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेने हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्याने समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भावना व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version