‘द केरळ स्टोरी’ पहिल्याच दिवशी सुपरहिट!

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी कमाई

‘द केरळ स्टोरी’ पहिल्याच दिवशी सुपरहिट!

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट शुक्रवार, ५ मे रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला विरोध करण्यात आला होता. मात्र, वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी कमाई केली आहे. तत्पूर्वी, या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने नवा विक्रम रचला होता. देशभरात ३२ हजार तिकिटांची विक्री होऊन हा चित्रपट वर्षातील पाचव्या क्रमांकाचा जास्त आगाऊ बुकिंग केलेला चित्रपट ठरला आहे.

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच हा सिनेमा वादाच्या गर्तेत सापडला होता. मात्र, पहिल्याच दिवशी हा चित्रपट हिट ठरला आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने ७.५ कोटींची कमाई केली आहे. आठवड्याच्या अंती हा चित्रपट आणखी कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाचं कथानक नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या शालिनी उन्नीकृष्णनवर आधारित आहे. केरळमधील मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा हा सिनेमा आहे.

हे ही वाचा:

सुरक्षा दलाला यश, बारामुल्लामध्ये दहशतवाद्याचा खात्मा

इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या राज्याभिषेक सोहळ्याला हिंदू धर्मगुरूंची उपस्थिती

‘दहशतवादी उद्योगाचे प्रवक्ते’, जयशंकर यांनी बिलावलना सुनावले

दाऊद इब्राहिमचा प्रश्न ऐकताच पाकिस्तानचे बिलावल गडबडले!

सुदीप्तो सेन दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. या सिनेमात अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भूमिकेत असून योगिता बिहानी, सिद्धी इडनानी आणि सोनिया बलानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाची निर्मिती ३० कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी ‘द केरळ स्टोरी’ ३ ते ५ कोटींची कमाई करेल, असा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र, हा अंदाज खोटा ठरवत सिनेमाने चांगली कमाई केली आहे.

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेला काश्मीर फाईल्सही वादात सापडला होता. मात्र, तरीही या चित्रपटाने जवळपास २५० कोटी रुपयांचा गल्ला जमवत यशस्वी चित्रपटांच्या यादीत नाव कमावले होते.

Exit mobile version