चांद्रयान- ३ मोहिमेचा प्रवास मोठ्या पडद्यावर दिसणार

‘मिशन मंगल’ सिनेमाचे दिग्दर्शक जगन शक्ती यांची माहिती

चांद्रयान- ३ मोहिमेचा प्रवास मोठ्या पडद्यावर दिसणार

इस्त्रोची चांद्रयान- ३ मोहीम यशस्वी झाली असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. भारताच्या विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग केले. ४० दिवसांच्या या प्रवासाकडे साऱ्या जगाचे लक्ष असून आता लवकरच इस्रोचे हे यश आणि चांद्रयानाचा प्रवास मोठ्या पडद्यावर लोकांना दिसणार आहे.

‘मिशन मंगल’ सिनेमाचे दिग्दर्शक जगन शक्ती यांनी चांद्रयान मोहिमेवर सिनेमा काढण्याचा निर्णय घेतला आहे. एका माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की, “आम्ही ही संधी जाऊ देणार नाही. मी आता या विषयावर थोडा विचार करतोय. यासाठी माझ्या मोठ्या बहिणीकडून काही माहिती घेत आहे. माझी बहीण इस्रोमध्ये शास्त्रज्ञ आहे.”

पुढे ते म्हणाले की, चांद्रयान- ३ वर बनवल्या जाणार्‍या चित्रपटात ‘मिशन मंगल’मध्ये काम करणाऱ्या टीमलाच घ्यायचे आहे. मात्र, या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार असेल का याबाबत त्यांनी माहिती दिलेली नाही. ही माहिती त्यांनी मुलाखतीत दिली असून अद्याप याबाबत अधिकृत काहीही माहिती दिलेली नाही.

या मोहिमेच्या यशानंतर लगेचच जगन शक्ती यांनी चित्रपट बनविण्याचा विचार सुरू केला आहे. मिशन मंगल बनवण्याचे काम सुरू झाले तेव्हा देखील त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची मदत घेतली होती. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता तर विद्या बालन, सोनाक्षी सिन्हासह इतर अभिनेत्री चित्रपटात शास्त्रज्ञांच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

हे ही वाचा:

ठाकरे म्हणतात, भाजपासोबत पॅचअप करू शकलो असतो पण…

चांद्रयान- ३ मोहिमेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला बळ

चांद्रयानात इस्रोकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर

विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा हा क्षण!

भारताच्या यशस्वी मंगळ ग्रहावरील मोहिमेनंतर ‘मिशन मंगल’ नावाच सिनेमा आला होता. यामध्ये मंगळयानाच्या यशाचा प्रवास दाखवण्यात आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. जगभरात सुमारे २९० कोटी रुपयांचा व्यवसाय देखील केला होता.

Exit mobile version