भारताचा शेजारी असलेला देश बांगलादेशमध्ये सध्या अस्थिरता असून अंतर्गत कलहामुळे देशातील परिस्थिती एकूणच चिंतेची आहे. अशातच महिला टी-२० विश्वचषक स्पर्धा यंदा बांगलादेशमध्ये खेळवली जाणार होती. बांगलादेशकडे या स्पर्धेचे यजमानपद होते. मात्र, बांगलादेशमधील अराजकतेमुळे इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल म्हणजेच आयसीसीची चिंता वाढली होती. विश्वचषक स्पर्धा इतर ठिकाणी खेळवता येऊ शकते का यावर विचारविनिमय सुरू होता. अखेर आयसीसीने या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
महिलांचा टी-२० विश्वचषक २०२४ यंदा बांगलादेशमध्ये होणार हे निश्चित होते. मात्र, बांगलादेशमधील एकूणच परिस्थिती पाहता विश्वचषकाचे सामने खेळवण्यासाठी आयसीसीने नव्या ठिकाणाची घोषणा केली आहे. बांगलादेशमधील अराजकतेमुळे आणि तेथील परिस्थितीत सुधारणा न झाल्याने टी-२० विश्वचषकाचे सामने आता दुसऱ्या देशात आयोजित केले जात आहेत, अशी माहिती आयसीसीने दिली आहे.
The ICC Women’s #T20WorldCup 2024 has been moved from Bangladesh and will now be held in the United Arab Emirates.https://t.co/Pi3mUgvG7g
— ICC (@ICC) August 21, 2024
ऑक्टोबरमध्ये होणारी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धा आता बांगलादेशमध्ये होणार नसून ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये होणार आहे. तर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडेच (BCB) या स्पर्धेचे यजमानपद असेल. नुकत्याच झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ अल्लार्डिस यांनी याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बांगलादेशमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याबद्दल बीसीबीचे आभार. परंतु, सहभागी संघांपैकी अनेक सरकारने बांगलादेशमध्ये जाण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे हे शक्य झाले नाही. बांगलादेशकडेच या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद असेल. भविष्यात बांगलादेशमध्ये आयसीसी जागतिक स्पर्धेचे आयोजन करण्यास आम्ही उत्सुक आहोत. झिम्बाब्वे आणि श्रीलंकेने या स्पर्धेचे सामने त्यांच्या देशात खेळवण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु, आयसीसीने महिला टी-२० विश्वचषक २०२४ यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.”
हे ही वाचा :
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, भाजपकडून टीकेची झोड !
लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरच्या शाळेला कारणे दाखवा नोटीस
अलिशान कार, कोट्यवधींची घड्याळे जप्त करत मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक
महिला टी-२० विश्वचषक २०२४ येत्या ३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी टी-२० महिला विश्वचषकातील पहिला सामना ४ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. याआधी संघ वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्ध दोन सराव सामने खेळणार आहे.