भारतीय लष्कराने प्रथमच कॉम्बॅट सपोर्ट आर्म्स रेजिमेंटच्या महिला अधिकाऱ्यांना ‘कर्नल’चा दर्जा बहाल केला आहे. लष्करातील महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. अधिकृत निवेदन जारी करताना भारतीय लष्कराने म्हटले आहे की, पहिल्यांदाच कॉर्प्स ऑफ सिग्नल, कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रोनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (ईएमई) आणि कॉर्प्स ऑफ इंजिनीअरिंगच्या पाच लष्करी महिला अधिकाऱ्यांना निवड मंडळाद्वारे ‘कर्नल’चा (टाईम- स्केल) दर्जा देण्यात आला आहे. या महिला अधिकाऱ्यांना लष्करात २६ वर्षे सेवा दिल्याबद्दल हे पद देण्यात आले आहे.
लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना (कॉर्प्स ऑफ सिग्नल), लेफ्टनंट कर्नल सोनिया आनंद आणि लेफ्टनंट कर्नल नवनीत दुग्गल (ईएमई) आणि लेफ्टनंट कर्नल रिनु खन्ना आणि लेफ्टनंट कर्नल रिचा सागर (कॉर्प्स ऑफ इंजिनीअरिंग) या पाच महिलांना लष्कराने पदोन्नती दिली आहे.
हे ही वाचा:
ठाणे: शिवसेना महापौरच म्हणतात ‘नारायण राणे अंगार है!’
शहरी नक्षलवाद्यांना देशाविरुद्ध युद्ध पुकारायचे होते!
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेमुळे महाराष्ट्रात खळबळ
सॅटिस पुलाखालची अग्निरोधक यंत्रणा वायूवेगाने पळवली
भारतीय लष्करात आतापर्यंत फक्त आर्मी मेडिकल कॉर्प्स (एएमपी), जज ऍडव्होकेट जनरल (जेएजी) आणि आर्मी एज्युकेशन कॉर्प्स यामधील महिला अधिकारीच ‘कर्नल’ पदापर्यंत पोहोचू शकत होत्या. ‘कॉम्बॅट सपोर्ट आर्म’च्या महिला अधिकाऱ्यांना ‘कर्नल’चा दर्जा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. मागील आठवड्यातच सर्वोच्च न्यायालयाने महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परीक्षेस बसता येईल, असा आदेश दिला होता.
संरक्षण दलात लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेत भारतीय लष्कराकडून उचलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारतीय वायुदलात सध्या १२ महिला लढाऊ वैमानिक आहेत. भारतीय नौदलानेही चार महिला अधिकाऱ्यांना युध्दनौकेवर तैनात केल होते.