देशातील बहुतेक भागात सूर्य आग ओकतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आहेत, हैराण झाले आहेत. नागरिकांच्या चिंतेत भर म्हणून कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काळजी घेण्याचा सल्ला देण्यातही आलेला आहे. पुण्यातील तापमान दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे, तर मुंबईत ३६ ते ३८ अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज वर्तविला आहे. पुढील ७२ तासांत यंदाच्या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.
वाढत्या उकाड्याने मुंबईकरही हैराण झाले आहेत. घराबाहेर पडलेले मुंबईकर घामाने ओलेचिंब होऊन घरी परतत आहेत. शहरात अचानक हवेतील आर्द्रता वाढलेल्या उकाड्याचे प्रमुख कारण सांगितले जात आहे. बुधवारी कुलाब्यात ७९ टक्के, तर सांताक्रुझमध्ये ६७ टक्के आर्द्रतेची नोंद झालेली आहे. दोन्ही ठिकाणी कमाल तापमान ३३ अंशांच्या आसपास होते. यामुळे मुंबईकरांची प्रचंड लाहीलाही झाल्याने मुंबईकर त्रस्त झाले. १४ मेपर्यंत मुंबई, ठाणे आणि संपूर्ण कोकणात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
“नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ही चूक”
सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर, निकालात मुलींची बाजी
उद्धव ठाकरे अजूनही स्वतःच्या राजीनाम्याच्या प्रेमात
इम्रान खान यांच्या पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. शिरीन मजारी यांना अटक
हवामान खात्याने पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. दोन दिवसात तापमानात सात अंशांने वाढ होईल आणि पारा ४० अंशांची पातळी ओलांडेल असे भाकित वर्तविले आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रात तापमान ४५ अंशांपर्यंत जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. बुधवारी महाराष्ट्रात अकोला येथे सर्वाधिक ४३.५ इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. गुरुवारी जळगावमधील तापमान ४४.८ अंश नोंदवले गेले असून ते कालचे देशातील सर्वाधिक कमाल तापमान होते. सोलापूर ४१.५, नाशिक ४०.७ आणि पुण्याचे तापमान ४१ अंश नोंदवले गेले. तापमानात इतकी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात होणारे बदल हे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात मोच्चा चक्रीवादळ सक्रिय झाले आहे. त्यामुळेच तापमानात मोठी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.