सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती एम. फातिमा बीवी यांचे गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
फातिमा बीवी यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत त्यांनी महिलांसाठी आदर्श घालून ठेवला. कोणत्याही उच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या त्या पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश होत्या. यासोबतच आशिया खंडातील कोणत्याही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होण्याचा मानही त्यांना मिळाला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रावरही आपली छाप सोडली.
केरळमधील पंडालम येथील असलेल्या न्यायमूर्ती बीवी यांनी तिरुअनंतपुरमच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी मिळवली होती. त्यांचे शालेय शिक्षण हे पथनामथिट्टा येथील कॅथलिक हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. पुढे त्यांनी सरकारी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि १४ नोव्हेंबर १९५० रोजी वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी १९५० मध्ये केरळच्या खालच्या न्यायपालिकेत आपली कारकीर्द सुरू केली. यानंतर १९८३मध्ये त्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आणि १९८९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनल्या.
हे ही वाचा:
‘भारत-कॅनडामधील संबंध सुधारू लागले’!
ब्रिक्स सदस्यत्वासाठी पाकिस्तानचा अर्ज!
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंध; चार सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी!
मुख्याध्यापकावर १४२ विद्यार्थीनींनी केला लैंगिक छळाचा आरोप!
निवृत्तीनंतर तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी प्रथम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य म्हणून काम केले. राज्यपालपदाच्या कार्यकाळात त्यांनी तामिळनाडू विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणूनही काम केले. १९९० मध्ये त्यांना डी.लिट आणि महिला शिरोमणी सारखे सन्माननीय पुरस्कार मिळाले. त्यांना भारत ज्योती पुरस्कार आणि यूएस- इंडिया बिझनेस कौन्सिल (USIBC) जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.