भारतात पहिली कृत्रिम बुद्धीमत्तेवरील (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) ‘ग्लोबल इंडिया एआय- २०२३’ परिषद होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून या परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) क्षेत्रातील संशोधक, स्टार्टअप्स आणि भारतातील आणि जगभरातील गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात ही परिषद होणार आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वाढता वापर लक्षात घेता आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊन या परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेत एआय क्षेत्राशी संबंधित व्यापक विषयांचा समावेश असणार आहे. पुढील पिढीसाठी एआय प्रशिक्षण आणि प्राथमिक मॉडेल्स, आरोग्य सेवा, प्रशासन, वाहनांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, भविष्यातील एआय संशोधन पद्धती, एआय संगणकीय प्रणाली, गुंतवणुकीच्या संधी आणि एआय प्रतिभेचे संगोपन या विषयांचा यात समावेश असेल.
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर या परिषदेच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीकडे ‘ग्लोबल इंडिया एआय- २०२३’ ची रुपरेषा तयार करण्याची जबाबदारी असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल अर्थव्यवस्था सल्लागार गटाचे सदस्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राशी संबंधित महत्वाच्या व्यक्तींचा यात समावेश आहे.
हे ही वाचा:
अजितदादांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, शरद पवारांनी पुतण्याविरोधात दंड थोपटले
जी२० च्या पाहुण्यांना त्रास नको म्हणून दिल्लीत लंगूरचे कटआऊट !
कुर्ल्यात गुंडाने केला गोळीबार, पूर्ववैमनस्यातून घडली घटना
लोखंडवाला १२० फूट डीपी रोड वाहतुकीसाठी पुन्हा खुला
या क्षेत्राशी निगडीत जगातील सर्वोत्कृष्ट आणि प्रतिभावंत व्यक्तींना एका व्यासपीठावर एकत्र आणणे हा सरकारचा दृष्टीकोन असल्याचे मत राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केले. जागतिक एआय उद्योग, स्टार्टअप्स, व्यावसायिक, संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या वार्षिक कार्यक्रमांच्या वेळापत्रकात या परिषदेमधील उपस्थिती महत्त्वाची ठरेल अशी अपेक्षा असणार आहे. ग्लोबल इंडिया एआय परिषद, भारताचा एआय क्षेत्रातील आवाका आणि नवोन्मेष व्यवस्थेला देखील चालना देईल असे राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले.