कंपनीचा ‘पोलादी’ निर्णय
कोरोनामुळे बळी गेलेल्या टाटा स्टीलच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना या संकटकाळात मोठा आधार कंपनीने दिला आहे. बळी गेलेल्या कुटुंबाला त्या व्यक्तीच्या निवृत्तीच्या वयापर्यंतचा संपूर्ण पगार आणि सर्व वैद्यकीय सुविधांचे लाभ तसेच घरासंदर्भातील सोयी उपलब्ध करून देण्याचा ‘पोलादी’ निर्णय टाटा स्टीलने घेतला आहे.
रविवारी टाटा स्टीलने या उपक्रमाची घोषणा केली. कोरोनामुळे टाटा स्टीलमधील ज्या कर्मचाऱ्याचा मृत्यू ओढवला असेल त्याच्या कुटंबीयांना आता चिंता करण्याची गरज नाही. कुटुंबाला सुरक्षितता देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार बळी गेलेल्या व्यक्तीने वयाची साठी ज्या वर्षी ओलांडली असती तोपर्यंत त्याचा संपूर्ण पगार आणि वैद्यकीय सुविधा, घराच्या सुविधा त्याच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय टाटा स्टीलने घेतला आहे.
हे ही वाचा:
राज्य सरकारच्या हिटलरशाही विरोधात भाजपा कार्यकर्ता लढत राहील
काँग्रेस नेत्याने केली ठाकरे सरकारची पोलखोल
‘इंडियन व्हेरीअंट’ म्हणणाऱ्या कमलनाथांवर गुन्हा
एफकॉन्स कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
त्याशिवाय, टाटा स्टीलने असाही निर्णय घेतला आहे की, टाटा स्टीलचे अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी असतील त्यापैकी कुणाचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्चही कंपनी उचलणार आहे.
टाटा उद्योगसमुहाने नेहमीच देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. दातृत्वाचे आदर्श म्हणून टाटा उद्योगसमूहाकडे पाहिले जाते. कोरोनाच्या या संकटकाळात टाटा स्टील उद्योगसमुहाने नवा पायंडा घालून देताना कोरोनाने बळी गेलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाना खूप मोठा दिलासा दिला आहे.
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने नेहमीच एक पोलादी ढाल बनून संरक्षणाची भूमिका घेतली आहे. कोरोनाच्या संकटकाळातही हीच भूमिका कायम आहे. त्यामुळे या संकटाकाळातही टाटा स्टील हे कुटुंब आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे.