संपूर्ण देशाचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरील महानाटय म्हणजे ‘जाणता राजा’. ‘जाणता राजा’ या नाटकाचे प्रयोग आसाममध्ये करण्यात येणार असल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे. ‘जाणता राजा’ प्रमाणेच आसाममधील योद्धे लचित बरफुकन यांचे चरित्र आणि इतिहास जगासमोर आणण्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘जाणता राजा’ या नाटकाचे प्रयोग आसाममध्ये करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पीआयबीने महाराष्ट्रातील काही पत्रकारांचा आसाम आणि मेघालय या राज्यांचा अभ्यासदौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात पत्रकारांनी गुवाहाटी येथे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री सरमा यांनी ही माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, त्यांचे चरित्र यांचा परिचय जगभरात सर्वांना आहे. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे मुघलांचे आक्रमण परतवून लावले त्याचप्रमाणे आसाममध्येही योद्धा लचित बरफुकन यांनी मुघलांशी लढा दिला.
लचित यांचा इतिहास, पराक्रम याचा परिचय मात्र आसाम पुरताच मर्यादित राहिला आहे. त्यांच्याही चरित्राचा परिचय भारताला व्हावा यासाठी शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ नाटकाप्रमाणेच त्यांच्या चरित्रावरही नाटय़प्रयोग केले जावेत, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. त्यांच्या सूचनेप्रमाणे आसाममधील नाटककारांना लचित बरफुकन यांच्या चरित्रावर नाटक सादर करण्याचा अनुभव मिळावा, यासाठी आसाममध्ये सर्वत्र ‘जाणता राजा’चे प्रयोग करण्यात येणार आहेत, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
रश्मिकाच्या समर्थनार्थ अभिनेते सरसावले!
दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश
बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून समन्स
छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान स्फोट
आसाममधील आरोग्य, पर्यटन क्षेत्रातील विकासाचीही त्यांनी यावेळी माहिती दिली. २०२६ पर्यंत आसाममधील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत १६ वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मुंबईत मोठय़ा प्रमाणात आसाममधील नागरिक राहतात. त्यांच्यासाठी तसेच महाराष्ट्रातील कामाख्या देवीच्या भाविकांसाठी मुंबईमध्ये कामाख्या देवीचे मंदिर आणि नामघर उभारण्यात येणार असून त्यासाठी जमिनीचा शोध सुरू आहे, अशीही माहिती समोर आली आहे. यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही सरमा यांनी सांगितले.