भारतात सध्या क्रिकेट विश्वचषकाचा थरार रंगलेला दिसत आहे. या स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी सुरू असून भारताने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. यातच भारतीय संघाने श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचा मोठ्या धावसंख्येच्या फरकाने पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाने केलेला श्रीलंकेचा पराभव श्रीलंकन क्रीडामंत्र्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे श्रीलंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
श्रीलंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी संपूर्ण क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्ध श्रीलंकेचा तब्बल ३०२ अशा मोठ्या धावसंख्येच्या फरकाने पराभव झाला होता. शिवाय श्रीलंकेचा संघ विश्वचषक स्पर्धेतूनही बाहेर पडला आहे. त्यामुळे श्रीलंकन प्रशासनाने हे पाऊल उचललं आहे. सोमवार, ६ नोव्हेंबर रोजी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. श्रीलंकेंने यंदाच्या या विश्वचषकात अतिशय निराशाजनक कामगिरी केली असून आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यात श्रीलंकेने केवळ दोन विजय मिळवले आहेत.
श्रीलंकेच्या या वाईट कामगिरीमुळे त्यांच्या देशात निदर्शने सुरु झाली होती. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने याबाबत निवड समितीला जाब विचारलाच, पण त्यापुढे जात थेट क्रिकेट बोर्डच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्ड हा देशद्रोही आणि भ्रष्ट आहे, अशी टीका केली होती. तर, त्यांनी बोर्डाच्या सदस्यांकडे राजीनामे देखील मागितले होते.
दरम्यान, क्रीड मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी क्रिकेट बोर्डाला निलंबित केले आहे. एक अंतरिम समिती स्थापन केली असून त्याचे नेतृत्व कर्णधार अर्जुन रणतुंगा करणार आहे, ज्याने श्रीलंकेला १९९६ मध्ये विश्वविजेते बनवले होते. अध्यक्ष अर्जुन रणतुंगा व्यतिरिक्त, अंतरिम समितीमध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिलेल्या आणखी पाच लोकांचा समावेश केला आहे. ही अंतरिम समिती श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी स्थापन केली असून, ही समिती सध्या श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाचे काम पाहणार आहे.
हे ही वाचा:
विराटने शतक ठोकले, पण दक्षिण आफ्रिकेचे शतकही नाही
एक कोटीची लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याला रंगेहाथ पकडले!
शेतांत आग लावण्यास विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यालाच राब जाळायला लावले!
गाझामध्ये युद्धबंदीसाठी अरब नेत्यांचा अमेरिकेवर दबाव!
भारताचा श्रीलंकेवर मोठा विजय
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात २ नोव्हेंबर रोजी मुंबईमधील वानखेडे मैदानावर सामना झाला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ विकेट्सच्या मोबदल्यात ३५७ धावा उभ्या केल्या होत्या. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजाना चांगली कामगिरी करता आली नाही आणि श्रीलंकेचा अख्खा संघ अवघ्या ५५ धावात गारद झाला. त्यामुळे भारताने हा सामना ३०२ धावांनी जिंकला.