भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये सध्या भारतामध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. पाहिल्या कसोटीत इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत मात्र भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड ठेवत विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. भारताने इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीत १०६ धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबतच भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्येही मोठी उसळी घेतली आहे. यात भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी इंग्लंडसमोर ३९९ धावांचे आव्हान होते. त्यांचा दुसरा डाव २९२ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराह याने या कसोटीत ९ विकेट्स घेतले. पहिल्या डावात त्याने ६ गडी बाद केले. तर, दुसऱ्या डावात ३ गडी बाद केले. पहिल्या डावात त्याला कुलदीप यादव याची साथ मिळाली तर दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनने दुसरी बाजू सांभाळून घेतली. त्याने दुसऱ्या डावात ३ गडी बाद केले.
भारताने या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारताने ३९६ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये सलामीचा फलंदाज यशस्वी जैयस्वाल याने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिले द्विशतक झळकवत २०९ धावांची खेळी साकारली. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात २५३ धावा केल्या. बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लडच्या संघाने गुढघे टेकले. त्यानंतर भारताचा दुसरा डाव २५५ धावांत आटोपला. पुढे इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचे आव्हान होते. मात्र, त्यानंतर त्यांचा संघ २९२ धावा करून माघारी परतला आणि भारताचा विजय झाला.
अश्विन ठरला इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज
दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी तीन विकेट्स घेऊन रविचंद्रन अश्विन इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध ९७ विकेट्स घेत अश्विनने माजी क्रिकेटपटू बीएस चंद्रशेखर यांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम बीएस चंद्रशेखर यांच्या नावावर होता. अश्विन आता इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक ९७ बळी घेणारा भारताचा गोलंदाज बनला आहे. लवकरच तो ५०० विकेट्सचा टप्पाही गाठणार आहे. अश्विनच्या नावावर आता ४९९ बळी आहेत.
हे ही वाचा:
‘सातत्याने माझा सल्ला धुडकावल्यानेच तुरुंगात जाण्याची वेळ’
२०२६ फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न्यू जर्सीला!
उत्तराखंड मंत्रिमंडळाची समान नागरी कायद्यावर मोहोर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये भारताची उसळी
भारताने इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीत तब्बल १०६ धावांनी पराभव केला. भारताने मालिकेत बरोबरी साधली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड २८ धावांनी सामना जिंकला होता. याचा परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीवर झाला होता. भारतीय संघ दुसऱ्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर पोहचला होता. मात्र, भारताने दुसऱ्या कसोटीत जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला आणि ५२.७७ विनिंग पर्सेंटेज मिळवत दुसरे स्थान मिळवले. सध्या ऑस्ट्रेलिया या पॉाईंट टेबलमध्ये ५५ विनिंग पर्सेंटेजसह अव्वल स्थानावर आहे.