महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. येत्या काही दिवसातच निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्यानुसार, राज्यातील सर्व पक्षांनी तयारी करण्यास सुरवात केली आहे. याच दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीचा आढावा घेतला, यासाठी सर्व सरकारी संस्था आणि ११ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यानंतर निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले, तसेच राज्य निवडणूक आयोगाला महत्वाच्या सूचनाही केल्या.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, ‘आमचा महाराष्ट्र, आमचे मतदान’ अशी टॅगलाईन यंदाच्या निवडणुकीसाठी घेण्यात आली आहे. राज्यातील उत्सवामध्ये लोकांचा जसा समावेश असतो, त्याचप्रमाणे सर्वजण मतदान करतील अशी खात्री आहे. ‘आपले मत, आपला हक्क’, असे निवडणूक आयुक्तांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र दौऱ्यात आमची ११ राजकीय पक्षांसोबत चर्चा झाली. दिवाळी, देव दिवाळी, छट पूजा असे आगामी सण लक्षात घेवून निवडणुकीची तारीख जाहीर करावी, अशी सर्व पक्षांनी आमच्याकडे मागणी केली. तसेच निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना लागोपाठ सुट्ट्या येणार नाहीत, आठवड्यातील मधल्या दिवशी निवडणुका घ्याव्यात, जेणेकरून लोक सुट्ट्या घेवून बाहेर जाणार नाहीत, या सर्व गोष्टींचा विचार करण्याची मागणी सर्व पक्षांनी केली.
२६ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे, त्या अगोदर विधानसभेच्या निवडणुका व्हाव्यात असेही पक्षांनी सूचीत केल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले. प्रचारा दरम्यान फेकन्यूजच्या बातम्या देखील अनेक सोशल मिडीयावर येतात, याचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली.
हे ही वाचा :
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी हाणामारी, जिथे काँग्रेस तिथे स्थिरता नाही!
आरोपी असलेल्या मुख्यमंत्र्याच्या पाठीशी राहुल गांधी आहेत का ?
हिजबुल्लाच्या प्रमुखाच्या हत्येची चर्चा, इराणच्या सर्वोच्च नेत्याला सुरक्षित स्थळी हलवले!
वडिलधाऱ्यांच्या आयुष्यात समाधानाच्या क्षणासाठी तीर्थदर्शन योजना
निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीच्या नियोजनाची माहितीही दिली. राज्यात एक लाख ८६ हजार मतदान केंद्रे असतील, शहरी आणि ग्रामीण भागात जवळपास सारखीच मतदान केंद्रे असतील. यासह मतदानाच्या लांब रांगा टाळण्यासाठी दिशादर्शक ठेवण्यात येणार आहे. रांगेतल्या मतदारांना बसण्यासाठी खुर्च्याही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णयही घेतला आहे, ज्यामुळे उमेदवार आणि पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना शपथपत्रात त्यांची वैयक्तिक माहिती, गुन्ह्या असल्यास त्याची माहिती, स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबतची माहिती द्यावी लागते. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुन्ह्यांबाबत वृत्तपत्रातून तीनदा माहिती द्यावी लागणार आहे. त्याबाबत माध्यमांमधून माहिती द्यावी लागणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
तसेच गु्न्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी का दिली? याबाबत संबंधित राजकीय पक्षांनाही कारण द्यावे लागणार आहे. तुमच्या मतदारसंघात चांगले उमेदवार नव्हते का? याबाबतही माहिती पक्षांना द्यावी लागणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, या नव्या निर्णयामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे. यासह निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार याबाबत लवकरच माहिती देणार असल्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन निवडणूक आयुक्तांनी केले.