जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पाकिस्तानी ड्रोनला हुसकावून लावल्याची माहिती सोर आली आहे. सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बीएसएफच्या जवानांनी एका पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार करून त्याला पाडायचा प्रयत्न केला. मात्र, हे ड्रोन पाकिस्तानी सीमेमध्ये पुन्हा जाण्यास यशस्वी झाले. जवानांनी सुमारे २५ राउंड फायर करुनही हे ड्रोन पाकिस्तानी सीमेत परत गेले.
शुक्रवारी रात्री उशिरा पाकिस्तानच्या बाजूने ड्रोनची हालचाल असल्याचे बीएसएफच्या जवानांना लक्षात आले आणि त्यांनी सुमारे २५ राउंड फायर केल्या. ड्रोन पाडण्याचा जवानांनी पुरेपूर प्रयत्न केला मात्र हे ड्रोन पुन्हा पाकिस्तानी सीमा पार करण्यात यशस्वी ठरले. गोळीबारानंतर ड्रोन पाकिस्तानी सीमेकडे परत गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर, ड्रोनद्वारे शस्त्रे किंवा अंमली पदार्थांची तस्करी होणार नाही याची खात्री करण्यासाठी रामगढ सेक्टरमधील नारायणपूर येथील बोर्डेट चौकीच्या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली. बीएसएफच्या वाहनातील जवानांचा एक ड्रोन पाकिस्तानच्या अश्रफ अली पोस्टवरून भारताच्या नारायण पोस्टमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना आढळले. यानंतर बीएसएफच्या जवानांनी या ड्रोनवर गोळीबार केला. गोळीबार होताच ड्रोन पाकिस्तानकडे परत गेला.
हे ही वाचा:
लव्ह जिहादचे प्रकरण; हिंदू असल्याची बतावणी करून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार
खळबळजनक! आई, पत्नी, मुलांची हत्या करून आरोपीची गोळ्या झाडून आत्महत्या
‘नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरलेले २० किलो आयडी जागीच निष्प्रभ’
रिकामं डोकं कुलगुरूंची अक्कल काढते तेव्हा..
याआधीही बीएसएफच्या जवानांनी अनेक वेळा पाकिस्तानी ड्रोन हल्ले आणि कारवाया हाणून पाडल्या आहेत. पाकिस्तानकडून भारतात शस्त्रे आणि ड्रग्जची तस्करी करण्यासाठी अनेकदा असे ड्रोन पाठवले जातात. भारतीय जवानांकडून ही कृत्ये हाणून पाडली जातात. भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन आणि हेरॉइन शोधण्याची प्रक्रिया सतत सुरूच असते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमृतसर सेक्टर टीमने दोन पाकिस्तानी ड्रोन जप्त केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सीमावर्ती गावात हरदो रतनमध्ये एक मोठा ड्रोन जप्त करण्यात आला असून दुसऱ्या सीमावर्ती गावात नेशतामध्ये एक छोटा ड्रोन जप्त करण्यात आले आहेत.