राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने आपल्या लोगोत बदल केला आहे. लोगोमधील राष्ट्रीय प्रतीक हटवण्यात आले असून त्यात पुराणातील आयुर्वेदानुसार विष्णुदेवतेचा अवतार असणाऱ्या धन्वंतरीते चित्र ठेवण्यात आले आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानुसार धन्वंतरीचे चित्र गेल्या वर्षभरापासून या लोगोत आहे. सुरुवातीला हे चित्र ब्लॅक अँड व्हाइट असल्याने ते प्रिंटआऊटमध्ये दिसत नसे. मात्र आता आम्ही हे चित्र लोगोच्या मध्यभागी आणि रंगीत केले आहे, असे अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्र संघटनेचा भाग असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या लोगोतही सापाचे वेटोळे असल्याचे चित्र असणारा लोगो आहे.
वैद्यकीय आणि वैद्यकीय व्यावसायिक हे चित्राचे प्रतीक गेल्या कित्येक वर्षांपासून वापरत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हे चित्र ग्रीक पुराणामध्ये प्रेरित आहे. या पुराणात साप ही देवता उपचारांची देवता म्हणून मानली जाते. त्या काळी ग्रीक समुदाय उपचारांसाठी सापांचा वापर करत असत.
हे ही वाचा:
दत्ता दळवी यांचे पाप प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठे आहे का?
युद्धबंदी दरम्यान जेरुसलेममध्ये दहशतवादी हल्ला, गोळीबारात तीन इस्रायली ठार!
९७ तेजस विमाने, १५० हुन अधिक लढाऊ हेलिकॉप्टर खरेदीस सरकारने दिली मंजुरी!
‘भारत-अमेरिका अंतराळ मोहिमेसाठी चार अंतराळवीरांना प्रशिक्षण’
लोगोमध्ये ‘इंडिया’ नव्हे ‘भारत’ नाव
लोगोमध्ये ‘इंडिया’ नव्हे तर ‘भारत’ हे नाव नमूद करण्यात आले आहे. मात्र लोगो बदलल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लोगोमधील या बदलाकडून केरळमधील इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. ‘लोगोमध्ये नुकताच झालेला बदल आधुनिक वैद्यकीय बंधुभगिनींना मान्य नाही. नवीन लोगो चुकीचा संदेश देत असून आयोगाच्या वैज्ञानिक आणि धर्मनिरपेक्ष स्वरूपाला त्यामुळे हानी पोहोचत आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले असून हे पाऊल मागे घेण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तर, या विषयावर रविवारच्या नियोजित बैठकीत चर्चा केली जाईल, असे आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद कुमार अग्रवाल यांनी सांगितले.