देशाने एक अनमोल ‘रतन’ गमावलं!

रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

देशाने एक अनमोल ‘रतन’ गमावलं!

भारताच्या उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती काहीशी ठीक नव्हती. रतन टाटा यांना रविवार, ६ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर टाटा यांनी सोमवारी (७ ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वतः ट्विट करत आपल्या प्रकृतीची माहिती देत काळजी न करण्याचे सांगितले होते. रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती समोर आली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर त्यांच्या निधनाचे वृत्त आले. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर संपूर्ण देशभरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही, अशा आशयाच्या भावना सर्वत्र व्यक्त केल्या जात आहेत.

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमवलं नाही तर त्यांनी समाजकार्याला प्राधान्य देत माणुसकी जपण्याचे काम केले. देश प्रथम हे धोरण त्यांनी नेहमी अवलंबवलं. रतन टाटा यांचे वडील जेआरडी टाटा यांनी १९९१ मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडले आणि त्यांचा उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांना नियुक्त केलं. रतन टाटा यांनी १९९१ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर उपकंपन्यांच्या प्रमुखांकडून तीव्र प्रतिकाराचा सामना त्यांना करावा लागला होता. त्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करत टाटा यांनी सर्वांचे हित जपत काम केलं. सर्वांची मने जिंकली. त्यांनी टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं. त्यामुळे रतन टाटा यांचं नाव उद्योग क्षेत्रासोबतच सर्वसामान्यांमध्येदेखील आदराने घेतलं जातं. रतन टाटा यांनी २०१२ मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

रतन टाटा यांनी आपल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विचार केला. आपल्या कंपन्यांमधील कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे. ते कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करायचे. त्यांच्या प्रेमामुळे कर्मचारीदेखील टाटा यांच्यावर तितकाच प्रेम करायचा.

हे ही वाचा :

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा

पद्मविभूषण रतन टाटा यांचे निधन

एटीएसची रत्नागिरीत मोठी कारवाई, पाच संशयिताना अटक

उत्तरप्रदेशमधील तरुणीवर मुंबईत लैंगिक अत्याचार

टाटा यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्य आणि उद्योग क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना २००० साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना २००६ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या सर्वोष्ठ मानल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर रतन टाटा यांना केंद्र सरकारकडून २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. टाटा यांना २०१४ मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरविण्यात आलं होतं. त्यांना २०२१ मध्ये आसाम वैभव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. रतन टाटा यांना २०२३ मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्कराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. अशा अनेक पुरस्कारांनी रतन टाटा यांना देशात आणि विदेशात सन्मानित करण्यात आलं होतं.

Exit mobile version