चिनी शिष्टमंडळाचा २० बॅगा हॉटेलच्या खोलीत नेण्यासाठी आग्रह होता

चिनी शिष्टमंडळाचा २० बॅगा हॉटेलच्या खोलीत नेण्यासाठी आग्रह होता

नवी दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये चिनी शिष्टमंडळाकडे असलेल्या एका संशयित बॅगेवरून १२ तास ‘रामायण’ घडल्याचे वृत्त बाहेर येताच त्या संदर्भातील आणखी काही माहिती उघड होत आहे. संशयित उपकरण असलेल्या बॅगेसह २० बॅगा हॉटेलच्या रूममध्ये घेऊन जाण्याचा आग्रह चिनी शिष्टमंडळाने केला होता, असे उघड झाले आहे.

एका महिलेच्या नेतृत्वाखालील सहा जणांच्या चिनी शिष्टमंडळाने भारतीयांना या बॅगा स्कॅन करण्यापासून रोखले होते. यातील दोन तृतीयांश सदस्य नवी दिल्लीतील चीनच्या दूतावासातील अधिकारी होते. या उपकरणावरून तब्बल १२ तास नाट्य रंगले होते.

या बॅगेच्या विशिष्ट आकारामुळे सर्वांत आधी हॉटेलमधील सुरक्षारक्षकांचे या बॅगेने लक्ष वेधले. ‘या बॅगेतील संशयास्पद उपकरणाची लांबी आणि रुंदी १x१ मीटर होती. तसेच, ते सुमारे १० इंच जाड होते,’ अशी माहिती एका सूत्राने दिली. ‘व्हिएना कन्व्हेन्शन’ अंतर्गत नियमावलीनुसार, जी-२० शिखर परिषदेसाठी येणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या बॅगा तपासल्या जाणार नाहीत, असा नियम असल्यामुळे त्यांच्या बॅगा विमानातून काढल्यानंतर तपासण्यात आल्या नव्हत्या.

चिनी शिष्टमंडळाने जेव्हा बॅगांची तपासणी करण्यास नकार दिला. तेव्हा भारतीय सुरक्षा दलाने तिघा अधिकाऱ्यांना त्यांच्या हॉटेलच्या बाहेर तैनात केले होते. हे अधिकारी प्रत्येक तासाने बदलले जात होते. अशा प्रकारे १२ तास त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली. अखेर त्यांनी त्यांच्या बॅगा नवी दिल्ली येथील चिनी दूतावासात पाठवण्याचे मान्य केल्यानंतरच हा पहारा काढण्यात आला.

हे ही वाचा:

बिहारमधील ‘वैशाली’ लोकशाही उत्सवात प्रियदर्शी दत्तांच्या पुस्तकाचे प्रकाशन

उद्धव ठाकरे यांच्या लंडनमधील प्रॉपर्टीवर शिक्कामोर्तब

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेतले, जरांगेंचे उपोषण मागे

केरळमध्ये ‘निपाह’चा पाचवा रुग्ण; मिनी लॉकडाऊन लागू

ही बॅग चिनी दूतावासात पाठवेपर्यंत विशेष एस्कॉर्ट टीम त्यांच्या सोबत तैनात करण्यात आली होती. या बॅगा दूतावासात पाठवल्यानंतर हे प्रकरण मिटले असले तरी बॅगेतील हे उपकरण काय होते, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे त्याचा शोध घेणे अद्याप सुरू आहे. ते हेरगिरी करणारे उपकरण होते की नेटवर्क ‘जॅम’ करणारे एखादे यंत्र होते, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी अद्याप चीनकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

Exit mobile version