कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. २ हजार ४१० प्रतिक्विंटल दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच केंद्राकडून २ हजार ४१० प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी फडणवीस यांनी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्यानंतर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली. यानंतर केंद्र सरकार २ हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल भावाने नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
हे ही वाचा:
एकदम ‘बेस्ट’; ताफ्यात दाखल होणार २४०० इलेक्ट्रिक बसेस
मुख्यमंत्री शिंदे रात्री अचानक केईएम रुग्णालयात अवतरले
अभिनेते प्रकाश राज यांनी चांद्रयानावरून उडवली खिल्ली
५०० घरांची सोडत; गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळणार
शेतकरी आंदोलन करू लागले, त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांचा प्रतिनिधी म्हणून ४० टक्के निर्यात शुल्काच्याबाबत पुर्नविचार करावा. कांद्याचे भाव बाजारात पडले, तर नाफेड आणि एनसीएटीच्या माध्यमातून त्याची खरेदी करावी, अशी विनंती वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना केल्याचे धनंजय मुंडे दिल्लीतून म्हणाले.